मुंबई बातम्या

मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापुरात रॅपिंगची क्रेझ ; रंगसंगतीतून रुबाब – Sakal

कोल्हापूर : वाहनांच्या क्रमांकापासून ते उंची मोटार खरेदीपर्यंत कोल्हापूरची वेगळीच ओळख आहे. आता यात रॅपिंगच्या क्रेझने भर घातली आहे. मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापुरात एखाद्या विशिष्ट झगमगाट असलेल्या  रंगांमध्ये ते रॅपिंगच्या माध्यमातून करून दिले जाते. यामध्ये वाहनाचा मूळ रंग बदलत नाही. वाहनांच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठीसुद्धा रॅपिंगचा वापर होतो. त्यामुळे रॅपिंगने पेंटिंगला एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

एखादी मोटार आकर्षक रंगात असली तर त्याकडे आश्‍चर्यचकीत होऊन पाहिले जाते; मात्र आता केवळ उत्पादक कंपनीकडूनच बाजारात आणलेल्या रंगापेक्षा वेगळा लूक तुमच्या वाहनाला देता येणार आहे. काही दिवसांपर्यंत मुंबई, पुण्यात ही क्रेझ राजारामपुरीत दाखल झाली आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या प्रणव दुधगावकर या तरुणाने रॅपिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. प्रणवला लहानपणापासूनच गाड्यांची आवड आहे. त्यातूनच त्याने वाहनांना रॅपिंग करण्याचा नवा व्यवसाय कोल्हापुरात आणला. यापूर्वी रेडियमद्वारे जे किरकोळ काम होत होते, तेही आता रॅपिंगमधून होणार आहे. प्रत्यक्षात मुंबई, पुण्याशी स्पर्धा करणारे रॅपिंग तो कोल्हापुरात करीत आहे. यासाठी आवश्‍यक स्टिकर थेट परदेशातून आयात करीत असल्याचे प्रणव सांगतो.

हेही वाचा- Covid 19 Update : बिनधास्त या कोल्हापुरात कोरोनाचे कोण विचारतोय?

रॅपिंग म्हणजे काय?
वाहनांचा मूळ रंग न बदलता नवीन रंग देण्याची ही एक कला आहे. एकाच रंगातील स्टिकर संपूर्ण वाहनाला लावला जातो. फ्ल्युरसंटसह मिक्‍सिंग रंगात हे स्टिकर उपलब्ध आहेत. हे स्टिकर वाहनांना चिटकविणे म्हणजे रॅपिंग होय. वाहन कोणते यावर पाच हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत रॅपिंगचा खर्च अवलंबून असतो. एका दुचाकीचे संपूर्ण रॅपिंग करण्यासाठी तीन-चार, तर एका मोटारीसाठी आठवडा ते दहा दिवस लागतात.

पुण्या-मुंबईतील मोटारींचे रॅपिंग पाहून आनंद वाटत होता. उंची किमतीच्या मोटारींनाही रॅपिंग केले जाते, हे पाहून असे कोल्हापुरात का होत नाही, असे वाटले. मी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेताना नवीन काहीतरी करण्याचा निश्‍चय केला होता. त्यातूनच रॅपिंगची कल्पना प्रत्यक्षात आणली. सहा महिन्यांपूर्वी राजारामपुरीत हा व्यवसाय सुरू केला आहे.
– प्रणव दुधगावकर.

Source: https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/mumbai-and-pune-now-there-craze-wrapping-kolhapur-innovation