मुंबई बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाजही ऑनलाइन करा! – Loksatta

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई उच्च न्यायालयातील कामकाज पुन्हा एकदा ऑनलाइन पद्धतीने चालवण्याची विनंती बॉम्बे बार असोसिएशनने मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पत्राद्वारे केली.

वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांचे कामकाज सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे असोसिएशनच्या विनंतीवर मंगळवारी विशेष बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

न्यायदालनात होणारी गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने न्यायालयाचे कामकाज प्रत्यक्ष पद्धतीसोबतच आभासी पद्धतीने चालवण्याची विनंती असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे. गेल्या वर्षी करोनाच्या पाश्र्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले न्यायालयाचे कामकाज १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आले, तर मुंबईबाहेरील वकील वा पक्षकारांच्या प्रकरणांची सुनावणी ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येते.

परंतु मार्चच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने आधी नागपूर व नंतर औरंगाबाद येथील खंडपीठांचे कामकाज पुन्हा एकदा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले.

मुंबई खंडपीठाचे कामकाज अद्यापही प्रत्यक्षपणे चालवले जात आहे. मात्र मुंबईतील करोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस विक्रमी वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात वकीलवर्गही करोनाबाधित होत आहे. असे असतानाही न्यायदालनातील गर्दी काही कमी झालेली नाही. सार्वजनिक आरोग्याचा विचार करता यामुळे करोनाचा प्रसारच होईल. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता मुंबई येथील मुख्य खंडपीठाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीनेही चालवण्यात यावे, अशी विनंती असोसिएशनने मुख्य न्यायमूर्तींना केली आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी नोटीस प्रसिद्ध करत मुंबईबाहेरील वकिलांनी न्यायालयात न येता ऑनलाइन पद्धतीने सुनावणीला हजर राहावे, असे स्पष्ट केले आहे.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजाच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी १.३० व दुपारी २ ते ४.३० या वेळेत होईल. उच्च न्यायालय प्रशासनाने न्यायालयाने सोमवारी याबाबत नोटीस प्रसिद्ध केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 30, 2021 12:49 am

Web Title: make mumbai high court proceedings online too abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/make-mumbai-high-court-proceedings-online-too-abn-97-2432178/