मुंबई बातम्या

करोनाला हरवण्यासाठी एकट्या मुंबई महापालिकेनं आतापर्यंत केला ‘एवढा’ खर्च – Maharashtra Times

टीम मटा, मुंबई महानगर प्रदेश

करोनाचा शिरकाव झाला आणि मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका उपचार आणि उपाययोजनांच्या कामाला लागल्या. या पालिकांना यापूर्वी कधीच केला नव्हता इतका खर्च आरोग्य यंत्रणेवर करावा लागला. आतापर्यंत सुमारे दोन हजार कोटींहून अधिक खर्च करून मुंबई महापालिका आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ ठाणे व नवी मुंबई यांचा क्रम लागतो. मुंबई महानगर प्रदेशात मिळून गेल्या वर्षभरात सुमारे तीन हजार कोटींहून अधिक पैसे खर्ची पडले आहेत.

मुंबईत विविध रूग्णालये आणि करोना केंद्रांमध्ये मिळून सुमारे एक लाख रूग्णांवर उपचार करता येतील, अशी व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षभरात रूग्णालये, करोना केंद्रे, उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि यंत्रसामुग्रींसाठी दोन हजार कोटींहून अधिक खर्च केला आहे. यासाठी आरोग्य अर्थसंकल्पातील सुमारे ५०० कोटी तर आकस्मिक निधीतून १२०० कोटींहून अधिक खर्च झाले आहेत. अतिरिक्त खर्चासाठी ४५० कोटी जानेवारीत मंजूर झाले आहेत. करोनावरील खर्चासाठी प्रशासनाने मार्च २०२० मध्ये स्थायी समितीची आगाऊ मंजुरी घेऊन ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रशासन प्रस्ताव पाठवत नाही. खर्च झाल्यानंतर एकत्रित कार्योत्तर मंजुरीसाठी प्रस्ताव मांडले जातात. त्यास राजकीय पक्षांनी हरकत घेतली आहे. करोनासाठी नक्की किती खर्च झाला, याची माहिती प्रशासन जाहीर करत नसल्याने दोघांमध्ये वारंवार खटके उडत आहेत.

आकस्मिक निधी : १२०० कोटी

आकस्मिक निधी अतिरिक्त तरतूद : ४५० कोटी

विविध प्रमुख रूग्णालये : २०० कोटी

करोना केंद्रे : २१५ कोटी

सेव्हन हिल्ससह उपनगरीय रूग्णालये : ५०० कोटी

मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत : २५० कोटी

ठाणे : ८१ कोटी १५ लाख

ठाणे पालिकेने करोना नियंत्रणासाठी ८१ कोटी १५ लाख खर्च केले आहेत. राज्य सरकारकडून अनुदानापोटी ५.९७ कोटी, एमएमआरडीएकडून २५ कोटी आणि वित्त आयोगाकडून २३.२५ कोटी रुपये उपलब्ध झाले. ग्लोबल इम्पॅक्ट हब आणि अन्य करोना रूग्णालये उभारण्यासाठी काही बांधकाम संघटनांच्या माध्यमातूनही आर्थिक उभारणी केली आहे. मात्र त्याचा कोणताही जमाखर्च पालिकेकडून अद्याप मांडलेला नाही. प्रतिबंधावरील खर्चामध्ये औषधे खरेदीसाठी ५.५० कोटी, शस्त्रक्रिया साधनांसाठी ६ कोटी आणि अँण्टिजन किटसाठी २३ कोटी ९८ लाख खर्च केले आहेत.

वसई-विरार : २० कोटी

अवघ्या २० कोटींमध्ये करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा वसई-विरार पालिकेकडून करण्यात आला आहे. करोनावर खर्च करणारी आणि सरकारकडे सर्वात कमी अनुदान मागणारी मुंबई महानगर क्षेत्रातील वसई-विरार ही एकमेव पालिका असल्याचा दावाही केला आहे. कुठल्याही बाह्ययंत्रणेला काम न देता, पालिकेचे कर्मचारी वापरून आणि कमीत कमी खर्चात परिणामकारक उपाययोजना केल्या आहेत. स्वयंचलित वाहनाद्वारे निर्जंतुकीकरणासाठी महिन्याचा खर्च ७ कोटी होणार होता, मात्र तो खर्च टाळत पालिकेने कर्मचाऱ्यांना सायकली दिल्या. करोना केंद्र उभारताना त्याचा कायमस्वरूपी वापर होईल याचा विचार करत चंदनसार येथे करोना उपचार केंद्र उभारले. त्यासाठी ३ कोटी रुपयांचा खर्च आला. कॉल सेंटर न उभारता पालिकेची यंत्रणा तयार करून जनजागृती केली त्यामुळे मोठी आर्थिक बचत झाली.


कल्याण-डोंबिवली : १३० कोटी

रूग्णालये, विलगीकरण केंद्र, चाचण्या, औषधोपचार यासाठी कल्याण- डोंबिवली पालिकेने वर्षभरात १३० कोटी रुपये खर्च केला आहे. डॉक्टर आणि वैद्यकेतर कर्मचारी, विलगीकरणातील कर्मचारी यावर सर्वाधिक खर्च झाला आहे.

उल्हासनगर : ५० कोटी

उल्हासगनगरात २० मार्च, २०२० रोजी दुबईहून आलेली पहिली महिला रुग्ण आढळली होती. त्यानंतर पालिकेने शहरात कोविड आरोग्य यंत्रणेसाठी वर्षभरात जवळपास ५० कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. यात पालिकेने दोन टप्प्यात दीड कोटी रूपये खर्च करून एकूण ६० हजार टेस्टिंग किट खरेदी केल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिझवानी यांनी दिली आहे. खर्चाच्या ५० कोटींपैकी १५ कोटीची बिले लेखा विभागात सादर झाली आहे.

मिरा-भाईंदर : ७८ कोटी

करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या व्यवस्थेवर आतापर्यंत ७८ कोटींचा खर्च केला आहे. बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेकडून नोव्हेंबरमध्ये १२ कोटींची निविदा प्रक्रिया राबवत बाळासाहेब ठाकरे मैदानावर जम्बो करोना रुग्णालय तयार करण्यात आले. रुग्णालयांमध्ये त्यावेळी अतिरिक्त खाटांची व्यवस्था असताना हे कोविड रूग्णालय उभारले जात असल्याने महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी देखील विरोध केला होता. बाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट झाल्याने एकाही रुग्णांवर उपचार न करता फेब्रुवारीत ते रुग्णाल बंद करण्यात आले. त्यामुळे रुग्णालय व इतर व्यवस्था यांच्यावर केलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेल्याची चर्चा सुरू आहे.

नवी मुंबई : १०४ कोटी

नवी मुंबई पालिकेच्या वतीने करोना काळापासून आत्तापर्यंत १०४ कोटी खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक खर्च करोना केंद्र उभारणीवर झाला आहे. पालिकेच्या वतीने १४ करोना केंद्र उभारण्यात आली आहेत.

भिवंडी : २८ कोटी

करोनाचा उपाययोजनांवर भिवंडी पालिकेने आतापर्यंत २८ कोटींचा खर्च केला आहे. यामध्ये अलगीकरण तसेच विलगीकरण कक्षांची निर्मिती, औषधांचा खर्च आदींचा यामध्ये समावेश आहे. तसेच कंत्राटी तत्त्वावर डॉक्टर, नर्सेस आणि डेटा ऑपरेटरही घेण्यात आले होते. यासाठीही खर्च करावा लागल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/3000-crore-spend-on-health-system-for-coronavirus-in-mumbai-metropolitan-region-and-bmc-has-spend-more-than-2000-crore/articleshow/81403092.cms