मुंबई बातम्या

मुंबई: प्रेयसीला पेटवल्यानंतर तिने घट्ट मिठी मारली; प्रियकराचा होरपळून मृत्यू – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबईतील जोगेश्वरीत भयंकर घटना
  • प्रेयसीला पेटवून दिले, मिठी मारल्याने तरुणाचा मृत्यू
  • अडीच वर्षांपासून होते प्रेमसंबंध
  • पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. ३० वर्षीय तरुणाने प्रेयसीला पेटवून दिल्यानंतर तिने त्याला घट्ट मिठी मारली. यात तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. तर तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय खांबे असे मृताचे नाव आहे. वहिनीच्या २८ वर्षीय बहिणीसोबत त्याचे अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. त्याने लग्नासाठी मागणी घातली. मात्र, कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. दारूचे व्यसन असल्याने पीडितेनेही त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

सार्वजनिक ठिकाणी शिंकला, चिडलेल्या तरुणांनी पोलिसाचा नाक फोडला

मिळालेल्या माहितीनुसार, खांबे याने तिला मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ती घरी परतली. तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तरूण तिच्या घरी पोहोचला. त्याच्या हातात पेट्रोल भरलेली बाटली देखील होती. ती घरी एकटीच होती. तरुणाने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. ती मदतीसाठी धावा करू लागली. तरूण दरवाजातच उभा होता. ती दरवाजाकडे धावत गेली. तिने त्याला घट्ट मिठी मारली. तरूणाने तिच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला. दोघेही जळालेल्या अवस्थेत घराबाहेर आले. शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. दोघांना वाचवण्यासाठी त्यांनी आग विझवली. त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेले. खांबे हा जवळपास ९० टक्के होरपळला होता. जे. जे. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तर तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. पीडितेच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

imageदुहेरी हत्याकांड, ९ वर्षीय मुलीने सांगितली आपबीती; आधी चहा प्यायले, त्यानंतर…

Source: https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-30-year-old-man-attempt-to-kill-his-girlfriend-setting-her-on-fire-man-death-after-she-held-him/articleshow/80746401.cms