मुंबई बातम्या

गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांची ‘ही’ अनोखी शक्कल – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची हमीपत्र भरून घेण्याच्या सूचना सर्व पोलिसांना देण्यात आल्या असून आतापर्यंत ३०४३ गुन्हेगारांकडून बॉण्ड घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पूर्वी केवळ ५ ते १० हजारांचे हमीपत्र घेण्यात येत होते. यावेळी ही रक्कम २५ हजारांपासून ते ५० लाखांपर्यंतची आहे.

करोनाच्या लॉकडाउननंतर हळूहळू मुंबई पूर्वपदावर येऊ लागताच गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी यांची संख्या वाढू लागली. असे गुन्हे वारंवार करणाऱ्या ‘टॉप -२५’ गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी मुंबईतील ९४ पोलिस ठाण्यांना दिले होते. काही पोलिस ठाण्यांनी २५पेक्षा अधिक गुन्हेगारांची यादी बनविल्याने वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची संख्या तीन हजारांवर गेली. सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याचा दर्जा असतो. त्यानुसार सीआरपीसी ११० अंतर्गत नोव्हेंबर महिन्यापासून या सर्व गुन्हेगारांकडून हमीपत्र घेण्यास सुरुवात करण्यात आली. पुढील तीन वर्षे वागणूक चांगली राहील. कायदा आणि सुव्यस्था बिघडणार नाही तसेच आपल्या हातून गुन्हा घडणार नाही, अशी लेखी हमी गुन्हेगारांकडून घेण्यात आली आहे. तीन वर्षांची मुदत आणखी काही दिवस वाढविण्याचा अधिकार सहायक पोलिस आयुक्तांना आहे.

पूर्वी हमीपत्रासाठी ५ ते १० हजार रुपये भरावे लागत असल्याने गुन्हेगारांची पैसे भरण्याची तयारी असायची. मात्र आता रक्कम वाढली असून दिलेल्या हमीपत्रानुसार वागणूक आढळली नाही तर ही रक्कम वसूल केली जाईल. इतकेच नाही तर हमीपत्र मोडले म्हणून विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याचा दर्जा असलेले सहायक पोलिस आयुक्त गुन्हेगाराला तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकतात. त्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले असून ही मोहीम अशीच पुढेही ठेवणार आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-commissioner-param-bir-singh-has-directed-to-all-police-to-taking-bond-paper-from-criminals-for-prevent-crimes/articleshow/80402892.cms