मुंबई बातम्या

फॅक्ट चेक : माहिम दर्ग्याला मुंबई पोलिसांची सलामी, ही परंपरा की सत्ताधारी शिवसेनेचा दबाव? – TV9 Marathi

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुंबई पोलीस हजरत पीर मखदूम शाह बाबा यांच्या माहिम दर्ग्यात सलामी देताना दिसत आहेत. (Fact Check about Mumbai Police salute to Mahim Dargah).

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुंबई पोलीस हजरत पीर मखदूम शाह बाबा यांच्या माहिम दर्ग्यात सलामी देताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांच्या याच सलामीवरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माहिम दर्ग्यात मुंबई पोलीस सलामी देत आहेत, असा आरोप काही लोकांकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियातून शिवसेनेवर करण्यात आलेले हे आरोप खरे आहेत की खोटे याची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Fact Check about Mumbai Police salute to Mahim Dargah).

नेमकं काय व्हायरल होत आहे?

“मुंबई पोलीस पीर हजरत मखदूम शाह यांच्या दर्ग्याला सलामी देत आहेत. कधी कोणत्या मंदिरात सलामी दिली? तिथे तर बाळासाहेबांची कब्र खोदण्यात आली आहे. शिवसेना आता अंतिम टप्प्यात आहे”, अशा शब्दात सोशल मीडियावर टीका केली जात आहे. यासोबत मुंबई पोलिसांचा दर्ग्यात सलामी देतानाचा व्हिडीओ शेअर केला जात आहे (Fact Check about Mumbai Police salute to Mahim Dargah).

व्हिडीओ मागील खरं काय?

व्हिडीओत मुंबई पोलीस दर्ग्यात सलामी देत आहेत हे खरं आहे. मुंबई पोलीस दरवर्षी सलामी देतात. पण मुंबई पोलीस उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर सलामी देतात ही माहिती चुकीची असल्याचं समोर आलं आहे. खरंतर मुंबई पोलीस जवळपास 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या दर्ग्यात सलामी देतात, अशी माहिती समोर आली आहे.

‘सक्रॉल’ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हजरत पीर मखदूम शाह बाबा आणि मुंबई पोलिसांचं नातं खूप जुनं आहे. दरवर्षी माहिम दर्गा परिसरात ऊरुस भरविण्यात येतो. या ऊरुसा निमित्ताने देशभरातील लाखो लोक माहिम दर्ग्यावर येऊन मानाची चादर चढवितात. विशेष म्हणजे दरवर्षी मुंबई पोलीस सर्वात पहिली मानाची चादर चढवितात. पोलीस प्रशासन वाजत-गाजत ही चादर आणतात.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

“सध्यस्थितीत जिथे माहिम पोलीस स्टेशन आहे तिथे 14 व्या शतकात हजरत पीर मखदूम शाह बाबा राहायचे. माहिम पोलीस स्टेशन दर्ग्यापासून 200 मीटरच्या अंतरावर आहे”, अशीदेखील माहिती ‘सक्रॉल’ वेबसाईटवर देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या माहिम दर्ग्यावर सलामी देण्याच्या व्हिडीओचा वापर करुन लोकांची दिशाभूल करण्याचं काम काही लोकांनी केल्याचं यातून स्पष्ट होतं.

हेही वाचा : विजयाचा जल्लोष करताना कार्यकर्ते भान विसरले, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर कपबशा फोडल्या

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/fact-check-about-mumbai-police-salute-to-mahim-dargah-375881.html