मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाची कमाल, हॅट्रीकसह पाच चेंडूंत मिळवले चार बळी – Maharashtra Times

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने एका सामन्यात चांगलीच धमाल उडवल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाने हॅट्रीकसह पाच चेंडूंत चार विकेट्स मिळवण्याची किमया साधली. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो फक्त तिसरा गोलंदाज ठरला आहे.

सध्याच्या घडीला भारतामध्य सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुरु आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणारा फिरकीपटू राहुल चहर हा राजस्थानच्या संघाकडून खेळत आहे. राजस्थानकडून खेळताना राहुलने मध्यप्रदेशविरुद्ध ही चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

राहुलने पाच चेंडूंत चार विकेट्स कसे मिळवले, पाहा…
राजस्थानकडून सहावे षटक यावेळी राहुल टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर राहुलने मध्य प्रदेशच्या वेंकटेश अय्यरला बाद केले. त्यानंतर अखेरच्या चेंडुवर राहुलने रजत पाटीदारला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर पुढच्या षटकात जेव्हा राहुल गोलंदाजी करायला आला तेव्हा तो हॅट्रीकवर होता. आपल्या पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राहुलने अर्पित गौडला बाद केले आणि आपली हॅट्रीक साजरी केली. त्यानंतर राहुलने अव्हेश खानलाही क्लीन बोल्ड केले आणि पाच चेंडूंत चार बळी मिळवण्याची किमया साधली. यापूर्वी भारताच्या दोन गोलंदाजांनी अशी किमया साधली होती. २०१३ साली अमित मिश्रानेही अशीच कामगिरी केली होती. त्यानंतर २०१९ साली अभिमन्यू मिथूनने असाच कारनामा केला होता.

राहुलने या सामन्यात फक्त १४ धावा देत पाच विकेट्स मिळवले. राहुलच्या या कामगिरीच्या जोरावरच राजस्थआनला मध्य प्रदेशवर १० धावांनी विजय मिळवता आला. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १४७ धावा केल्या होत्या. यावेळी १४८ धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेशला १० धावांनी पराभव पत्करावा लागला. आता पुढच्या सामन्यात राहुलचा हा फॉर्म कायम राहतो का, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असेल. राहुलबरोबर या संघातून त्याचा भाऊ दीपक चहरही खेळत आहे. पण या सामन्यात मात्र दीपकला चांगली गोलंदाजी करता आली नाही. पण त्याचा भाऊ राहुलने मात्र ही कसर भरुन काढल्याचे पाहायला मिळाले.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/syed-mushtaq-ali-2021-rahul-chahar-picked-up-four-wickets-in-five-balls-including-hattrick/articleshow/80266253.cms