मुंबई बातम्या

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या ‘त्या’ मागणीला त्यांच्याच पक्षातून विरोध – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिकेत दोन आयुक्त असावेत, या केलेल्या मागणीला काँग्रेस पक्षातूनच विरोध करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत एकच आयुक्त असावा. एक आयुक्त प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी पुरेसे आहेत. दोन आयुक्तांची मागणी हे अस्लम शेख यांचे वैयक्तिक मत आहे, अशी भूमिका मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते रवी राजा यांनी मांडली आहे.

मुंबई महापालिकेला दोन आयुक्त असावेत या अस्लम शेख यांच्या मागणीला राजकीय रंग चढला असून काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई काँग्रेसकडून दोन आयुक्तांची मागणी करण्यात आलेली नाही, असेही रवी राजा यांनी सांगितले. ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याशी बोलून ही भूमिका मांडत आहे, असेही रवी राजा यांना सांगितले.

अस्लम शेख यांनी मंत्री म्हणून पत्रव्यवहार केला असला, तरी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यांनी याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही. मुंबई महापालिकेत सात परिमंडळांना उपायुक्त आणि चार अतिरिक्त आयुक्त योग्य पध्दतीने काम पाहतात. शहर आणि उपनगरासाठी दोन जिल्हाधिकारी ही महसूल विभागाची व्यवस्था आहे. त्याची तुलना आयुक्तांशी करता येणार नाही. काँग्रेस मुंबईचे कदापि विभाजन होऊ देणार नाही. भाजपला आता फक्त आरोप करण्याचे काम शिल्लक राहिले आहे, असा टोला रवी राजा यांनी लगावला.

‘काँग्रेसचे षडयंत्र’

मुंबईला दोन आयुक्त देण्याची शेख यांची मागणी निंदनीय असून, या मागणीआडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. काँग्रेसचे हे षडयंत्र भाजप कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/one-commissioner-is-enough-for-mumbai-municipal-corporation-says-congress-leader-and-bmc-opposition-leader-ravi-raja/articleshow/80205873.cms