मुंबई बातम्या

मुंबईत येताच कंगनाचा ‘जय महाराष्ट्र’! शिवसेनेला लगावला ‘हा’ टोला – Maharashtra Times

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून मुंबईबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना राणावत आणि शिवसेना असा सामना रंगला होता. हा वाद आता शमला असतानाच कंगना पुन्हा एकदा मुंबईत परतली आहे. तर, मुंबईत येताच तिनं पुन्हा एकदा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

मुंबईत परतताच कंगनानं सिद्धिविनायक व मुंबा देवीचे दर्शन घेतले. यावेळ कंगना हिरवी साडी, नाकात नथ व केसात गजरा अशा पारंपारिक मराठमोळ्या वेषात दर्शनासाठी आली होती. तसंच, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना तिनं शिवसेनेवरही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाहीये, असं म्हणत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी कंगनाला प्रश्न विचारला असताना तिनं यावर उत्तर देणं टाळलं आहे.

कंगनाचं ट्विट

मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर इथं सुरक्षित वाटत असल्याचं ट्विट कंगनानं केलं आहे. तसंच, जय हिंद व जय महाराष्ट्र असा नाराही दिला आहे.

वर्षा राऊत आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार का?; राऊत म्हणाले

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका टिकाटिप्पणी व आरोप केल्यामुळं कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तसंच, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर कंगनावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. यावर शिवसेनेनंही कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिनं आपल्या राज्यात निघून जावं, असा इशारा दिला होता.

पुन्हा ‘सामना’ रंगण्याची शक्यता; कंगना मुंबईत परतली
शिवसेनेनं दिलेल्या या इशाऱ्यानंतर कंगनानंही आव्हान दिलं होतं. त्यानंतर हे प्रकरण अधिक चिघळलं होतं. मुंबई महानगरपालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. तर कंगनानंही या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/i-need-ganpatti-permission-and-no-one-else-to-live-in-mumbai-says-kangana-ranaut/articleshow/80007451.cms