मुंबई बातम्या

मुंबई लोकल अधिक सुरक्षित; दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई लोकलमधील दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे दिव्यांग डब्यातील घुसखोरी रोखणे आणि डब्यातील गुन्हेगारीला आळा घालणे शक्य होईल.

एल्फिन्स्टन पादचारी पूल दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक बोलावली होती. यात मुंबई लोकलमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना गोयल यांनी दिल्या होत्या. ‘इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) बांधणी करण्यात आलेल्या तीन लोकल आणि सिमेन्स बनावटीची एक अशा एकूण चार लोकलमधील दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. या लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही सुरू करण्यात आले आहे’, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई पोलिस, रेल्वे पोलिस व रेल्वेसुरक्षा बल तथा रेल्वे कर्मचारी तसेच अन्य सक्षम लोक या डब्यातून अवैधरित्या प्रवास करत होते. २०१०पासून मी संघर्ष करत आहे. २०१३ साली अपंग आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना तक्रार दिली. मुंबई उच्च न्यायलयात २०१५ रोजी रिट याचिक दाखल केली. न्यायालयाने २५ जानेवारी २०१७ रोजी निकालात संपूर्ण लोकलमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले होते. माझ्या संघर्षाची पूर्तता नाही म्हणता येणार, पण पूर्ततेला सुरुवात झाली, अशी प्रतिक्रिया निर्धार विकलांग विकास सामाजिक संघटनेचे नितीन गायकवाड यांनी व्यक्त केली.

नव्याने बांधणी होणाऱ्या लोकलमधील सर्व डब्यांत सीसीटीव्ही असणार आहे. सध्या सेवेत असलेल्या लोकलमध्ये टप्प्याटप्याने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येईल, असे ही रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-railway-install-cctv-camera-on-handicapped-coaches-of-local-trains/articleshow/79916112.cms