मुंबई बातम्या

जेट एअरवेजविरोधात ईडीला दिलासा नाही – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

जेट एअरवेज व त्या कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरोधातील फसवणुकीचे प्रकरण बंद करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अहवालाला आक्षेप घेणारा आणि तपास सुरू ठेवण्याविषयी परवानगी मागणारा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्याविरोधात दाद मागणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी दिलासा मिळू शकला नाही. ईडीने याप्रश्नी केलेल्या फौजदारी रिट याचिकेवरील निर्णय जाहीर करताना ती फेटाळली असल्याचे न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील अकबर ट्रॅव्हल्स कंपनीने ४६ कोटी रुपयांच्या फसवणुकीबद्दल जेटविरोधात न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार केली होती. त्यात न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर एम.आर.ए. मार्ग पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये फसवणुकीचा एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. मात्र, नंतर पुरेसे पुरावे नसून हा दिवाणी स्वरुपाचा वाद असल्याचे सांगत हे प्रकरण बंद करण्याच्या विनंतीचा ‘सी’ समरी अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. मात्र, दरम्यानच्या काळात ईडीने पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. त्यामुळे ईडीने पोलिसांच्या ‘सी’ समरी अहवालाला आक्षेप घेऊन त्यात हस्तक्षेप करू देण्याची विनंती अर्जाद्वारे केली. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तो अर्ज १९ सप्टेंबरला फेटाळल्यानंतर ईडीने सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र, सत्र न्यायालयानेही अर्ज फेटाळल्याने ईडीने अॅड. श्रीराम शिरसाट यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली. ‘पोलिसांचा अहवाल हा निव्वळ धूळफेक आहे. जेटविरोधातील प्रकरण हे केवळ आर्थिक नुकसानीचे नसून या कंपनीने गुन्हेगारी स्वरुपाच्या व्यवहारांतून मिळवलेले पैसे परदेशी बँक खात्यांमध्ये वळवले आहेत. त्यामुळे मनी लाँडरिंग कायद्याखाली तपास होणे आवश्यक आहे’, असा युक्तिवाद ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मांडला होता. मात्र, कनिष्ठ न्यायालयांच्या निर्णयात कायदेशीर चूक नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडीची याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाची सविस्तर प्रत आज, मंगळवारी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-rejects-eds-petition-in-jet-airways-case/articleshow/79854718.cms