मुंबई बातम्या

Mumbai Local: मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी; सरकारने आता घेतला ‘हा’ निर्णय – Maharashtra Times

मुंबई:वकील आणि वकील संघटनांचे नोंदणीकृत कर्मचारी यांना आता सकाळी ८ ते ११ या वेळेतही मुंबईतील विशेष उपनगरीय लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वकिलांना सायंकाळी ४ ते संध्याकाळी ७ या वेळेत लोकल प्रवास करण्यास यापुढेही मनाईच असणार आहे. ( Mumbai Local Train News Latest Updates )

वाचा: भारत बंदचा प्रभाव महाराष्ट्रात किती?; काँग्रेसने केली ‘ही’ मोठी घोषणा

वकील आणि वकीलांसोबतच्या कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय घेताना त्यांना सकाळी ८ पूर्वी आणि नंतर सकाळी ११ ते सायंकाळी ४ आणि संध्याकाळी ७ नंतर अशा वेळांमध्ये लोकल प्रवासाची परवानगी राज्य सरकारने दिली होती. मात्र, आता हायकोर्टातही प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाल्याने वेळेचे हे बंधन काढावे, अशी विनंती वकिलांनी आपल्या प्रलंबित याचिकांमध्ये अर्ज दाखल करून केली होती. त्यानंतर राज्य सरकारने बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे सरकारने आज आपला निर्णय जाहीर केला आहे. आता परवाच्या याविषयीच्या सुनावणीत हायकोर्टात हा निर्णय सांगितला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

वाचा: मुख्यमंत्री अबोल असले तरी चतुर आहेत!; सरकारबाबत पवारांचं खूप मोठं विधान

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सर्वप्रथम अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकलसेवा सुरू करण्यात आली. करोनाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करूनच ही सेवा सुरू करण्यावर एकमत झाले. या लोकलसेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येत आहे. सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मागणी होत असली तरी करोनाची स्थिती लक्षात घेऊन त्यानुसारच पावले टाकण्यात येत आहेत. त्यानुसार आधी खासगी व सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्व महिला प्रवाशांना लोकलचे दार उघडण्यात आले. अर्थात त्यांच्यासाठी प्रवासाच्या वेळा ठरवून देण्यात आल्या. त्यापाठोपाठ २२ ऑक्टोबर रोजी वकिल व वकिलांसमवेत काम करणाऱ्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांनाही राज्य सरकारने लोकल प्रवासाची मुभा दिली होती. त्यात आता राज्य सरकारने वकिलांना अधिक दिलासा देणारे पाऊल टाकले आहे. त्यानुसार वकील व अन्य कर्मचारी सकाळच्या पिक अवरमध्येही लोकलने प्रवास करू शकणार आहेत.

वाचा: आठवडाभरात सर्वांसाठी लोकल सुरु? ‘हे’ नियम असणार बंधनकारक

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/lawyers-clerks-can-soon-travel-in-mumbai-local-train-during-peak-hours/articleshow/79611391.cms