मुंबई बातम्या

मुंबई महानगरात विना सिग्नल रिंगरूट, 2030 मध्ये रिंगरूट प्रत्यक्षात येणार – Sakal

मुंबई:  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे (एमटीएचएल) सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे काम सप्टेंबर 2022 मध्ये पूर्ण होणार आहे. हा मार्ग नवी मुंबई, रायगड, मुंबई पुणे महामार्गाला जोडला जाणार आहे. त्याचप्रमाणे एमटीएचएल, शिवडी-वरळी उन्नत मार्ग, विरार अलिबाग कॉरिडॉर, मीरा भाईंदर कोस्टल रोड या प्रकल्पांद्वारे येत्या दहा वर्षात महानगर क्षेत्रात रिंगरूट तयार होणार असून यावरून मुंबईकरांना विना सिग्नल प्रवास करता येईल, असा विश्‍वास एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी व्यक्त केला.

एमटीएचएल प्रकल्पाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त आर.ए.राजीव यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी आयुक्त राजीव यांनी ही माहिती दिली. एमटीएचएल प्रकल्प 22 किलोमीटर लांबीचा असून त्यावर सुमारे 16.5 किलोमीटर सागरी पूल असणार आहे. तर 5.5 किलोमीटर जमिनीवर पूल असणार आहेत. या प्रकल्पाला मुंबईच्या बाजूने शिवडी इंटरचेंज असेल. तसेच नवी मुंबईच्या बाजूने शिवाजी नगर इंटरचेंज आणि चिर्ले इंटरचेंज असणार आहे. 

नवी मुंबई विमानतळालाही हा मार्ग जोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विरार अलिबाग मल्टीमॉडल प्रकल्पालाही हा मार्ग जोडण्यात येईल. भाईंदर विरार ब्रिजचेही काम सुरू आहे. या विरार ब्रिजला विरार अलिबाग मल्टीमोडल प्रकल्पाची जोड असेल. कोस्टल रोडला हा प्रकल्प पुढे जोडला जाईल. तर शिवडी वरळी उन्नत मार्ग वरळी वांद्र सी लिंकला जोडण्यात येईल. त्यामुळे कोस्टल रोडने वरळी पर्यंतचा प्रवास करता येईल. हा रिंगरूट 2030 अखेरीस प्रत्यक्षात येईल, असा विश्‍वास राजीव यांनी व्यक्त केला.
 
एमटीएचएलवर लागणार टोल

एमटीएचएल प्रकल्पामुळे मुंबई महानगराचा प्रवास वेगवान होणार आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना टोल आकारण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी याबाबतचा निर्णय होणार आहे.
 
फ्लेमिंगोसाठी साऊंड बॅरिअर

शिवडी येथे दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पक्षांना या प्रकल्पाचा त्रास होऊ नये, यासाठी एमटीएचएल मार्गावर साऊंड बॅरिअर लावण्यात येणार आहेत. तसेच टाटा पॉवर कंपनीच्या जागेतही व्हिजन बॅरिअर लावण्यात येतील. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईपर्यंतचा प्रवासाचा सुमारे अर्धा तास वेळ वाचणार आहे. भारतातला तसेच जगातला सर्वात जास्त लांबीचा विक्रमही या सागरी सेतूच्या नावावर होणार आहे.
 
जपानच्या ऑर्थोट्रॉपिक तंत्रज्ञानाचा वापर

एमटीएचएल प्रकल्पात जपानच्या कंपनीचे ऑर्थोट्रॉपिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ब्रिजसाठी ऑर्थोट्रॉपिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे ब्रिज उभारणीसाठी केबल स्टेडची वायर वापरण्याची आवश्‍यता भासणार नाही. तसेच फ्लेमिंगो पक्षांनाही अडथळा होणार नसल्याचा दावा, अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच माहूल खाडीतून बोटी जाण्यासाठी या प्रकल्पाच्या दरम्यान एका मार्गिकेवर तात्पुरता ब्रिज तयार करून दिला आहे.
 
6 हजार हात दिवसरात्र राबताहेत

कोरोनाचा फटका एमटीएचएल प्रकल्पालाही बसला. कामगार आपल्या मूळ गावी गेल्याने प्रकल्पाचे काम थांबले. अखेर त्यांना विमानाने मुंबईत आणण्यात आले. यानंतर सुमारे तीन महिन्यात रखडलेले काम वेग वाढवून निश्‍चित टार्गेट पूर्ण केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला. या प्रकल्पासाठी दिवसरात्र सुमारे 6 हजार कामगार दिवसरात्र राबत असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले.

—————————-

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai MMRDA signal free ring route by 2030

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-mmrda-signal-free-ring-route-2030-381661