मुंबई बातम्या

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका | MNS Criticism on UP CM Yogi Adityanath – TV9 Marathi

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी मंगळवारी (1 डिसेंबर) संध्याकाळी मुंबईत दाखल होताच त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. याशिवाय आज (2 डिसेंबर) योगी बॉलिवूडच्या अनेक अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या या दौऱ्यावर मनसेकडून खरपूस टीका करण्यात येत आहे. ‘अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग”, अशा शब्दात मनसेने योगींवर निशाणा साधला आहे. (MNS Criticism on UP CM Yogi Adityanath setup Parallel Bollywood Industry)

उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला न्यायचं आहे. त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यामातून उत्तर दिलं आहे. योगी आदित्यनाथ मुंबईत वास्तव्यात असलेल्या ट्रायडेंट हॉटेलबाहेर मनसेने बॅनरबाजी केली आहे.

“कहा राजा भोज…और कहा गंगू तेली….”कुठे महाराष्ट्रचं वैभव”….तर कुठे युपीचं दारिद्र्य…असे मनसेने या बॅनरमध्ये म्हटलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’,” असेही या बॅनरवर छापण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे या बॅनरमध्ये मनसेकडून योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा ठग असे म्हटलं आहे. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं असल्याचंही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे गणेश चुक्कल यांनी हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही लावलं आहे.

दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्याकडून बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यावरुन जोरदार राजकारण रंगत आहे. महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांकडून यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. तर भाजपकडून याला पाठिंबा देण्यात आला आहे.

योगी आदित्यनाथ यांचा दौरा 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज (2 डिसेंबर) रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. योगी आदित्यनाथ 1 डिसेंबरला मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना झाले. ते 1 डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचले. त्यानंतर 2 डिसेंबरला त्यांनी मुंबईतील शेअर बाजाराला भेट दिली. यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती, बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे  आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होतील. (MNS Criticism on UP CM Yogi Adityanath setup Parallel Bollywood Industry)

संबंधित बातम्या : 

मुंबईत दाखल होताच योगी आदित्यनाथ यांची अक्षय कुमारसोबत बैठक, उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याबाबत चर्चा

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/politics/mns-criticism-on-up-cm-yogi-adityanath-tour-in-mumbai-for-setup-parallel-bollywood-industry-in-uttar-pradesh-333582.html