मुंबई बातम्या

मुंबई: विक्रोळीत म्हाडा कॉलनीतील इमारतीला आग – Times Now Marathi

मुंबई: विक्रोळीत म्हाडा कॉलनीतील इमारतीला आग& 

थोडं पण कामाचं

  • मुंबई: विक्रोळीत म्हाडा कॉलनीतील इमारतीला आग
  • सहाव्या मजल्यावरील एका खोलीत आग
  • अग्नीशमन दलाने वेळेत कारवाई करुन आगीवर मिळवले नियंत्रण

मुंबईः विक्रोळीच्या पश्चिम भागातील म्हाडा कॉलनीतल्या १४ मजली इमारतीला सोमवारी (३० नोव्हेंबर) संध्याकाळी आग लागली. ‘लेव्हल वन’ची आग लागली आहे अशी माहिती अग्नीशमन दलाला संध्याकाळी ६.३३ वाजता मिळाली. म्हाडा इमारत क्रमांक १४च्या सहाव्या मजल्यावरील एका खोलीत आग लागली. अग्नीशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी येऊन संध्याकाळी ७.०५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. नियमानुसार आग प्रकरणाची चौकशी होणार आहे. (fire at MHADA building in Vikhroli West Mumbai)

ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीमधील काही फ्लॅट एनटीपीसीच्या ताब्यात आहेत. ही इमारत हिरापन्ना मॉलपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सहाव्या मजल्यावरील एका खोलीत एसी काँम्प्रेसरमध्ये स्पार्किंग झाले. यानंतर आग लागली. खबरदारीचा उपाय म्हणून अग्नीशमन दलाने इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते. अवघ्या काही मिनिटांत आग नियंत्रणात आली आणि नागरिकांना परत त्यांच्या घरात जाण्याची परवानगी देण्यात आली. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली.

विक्रोळीतील आगीच्या दुर्घटनेआधी २४ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या साकीनाकामधील जरीमरी परिसरातल्या आनंदभुवन जवळ एका चाळीत सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १५ वर्षांच्या अलमस खान हिचा मृत्यू झाला. याआधी २१ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या नायर हॉस्पिटलच्या ओपीडी इमारतीला आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील वायर ज्या डक्टमध्ये जोडण्यात आल्या होत्या त्या डक्टमध्येच आग लागली. अग्नीशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून वेळेत कारवाई सुरू केल्यामुळे लवकरच आग नियंत्रणात आली. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. 

नायरच्या दुर्घटनेआधी २२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑर्किड सिटी सेंटर मॉल येथे ‘लेव्हल फाइव्ह’ आग लागल्यामुळे अग्नीशमन दलाने ब्रिगेड कॉल असल्याचे जाहीर केले. अग्नीशमन दलाच्या मोठ्या पथकाने सलग ५६ तास प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. यानंतर कूलिंगची प्रक्रिया सलग काही दिवस सुरू होती.

कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूला आग, ५ रुग्णांचा मृत्यू

गुजरातमधील राजकोट येथे कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU)  लागलेल्या आगीत ५ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाले. मावडी भागातील उदय शिवानंद रुग्णालयात २७ नोव्हेंबरच्या पहाटे ही दुर्घटना घडली. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  

बातमीची भावकी

कोव्हिड-19 रुग्णालयात लागलेल्या आगीबद्दल कोर्टाने व्यक्त केली काळजी

सर्वोच्च न्यायालयाने गुजरात येथील राजकोटच्या कोव्हिड-19 रुग्णालयाला लागलेल्या आगीची दखल घेतली आणि काळजी व्यक्त केली. जिथे नागरिकांना क्वाररंटाइन केले जात आहे अथवा उपचारांसाठी दाखल केले जात आहे तिथे दुर्घटना टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी. आगीला प्रतिबंध करणाऱ्या यंत्रणांची सोय करावी. आग लागणार नाही याची काळजी घ्यावी. देश कोरोना संकटाशी लढत आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना कोरोना संकट हाताळण्यासाठी तसेच आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी सूचना केल्या.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/fire-at-mhada-building-in-vikhroli-west-mumbai/323898