मुंबई बातम्या

‘क्रेडिट शेल’चाही मिळणार परतावा – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

लॉकडाउन काळातील विमान प्रवासाच्या तिकिटाची पूर्ण रक्कम प्रवाशांना परत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. काही कंपन्यांनी प्रवाशांना ‘क्रेडिट शेल’ (भविष्यातील प्रवास) देऊ केले आहे. तसे असले तरी ग्राहकांना या क्रेडिट शेल रकमेचा देखील पूर्ण परतावा मिळू शकेल. त्याबाबत संभ्रम असल्यास प्रवाशांनी मुंबई ग्राहक पंचायतला ई-मेल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाउनमुळे अनेक विमानसेवा कंपन्यादेखील आर्थिक अडचणीत आल्या आहेत. अशा कंपन्यांनी ग्राहकांना तिकिटाचा परतावा देण्याऐवजी ‘क्रेडिट शेल’ देऊ केले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या क्रेडिट शेलची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत असेल. क्रेडिट शेलचे मूल्य हे मूळ तिकिटाच्या रकमेएवढेच असेल. शिवाय प्रवास रद्द झाल्याच्या तारखेपासून ३० जून २०२० पर्यंत ०.५० टक्के प्रति महिना व १ जुलै २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ०.७५ टक्के प्रति महिना एवढे मूल्य वाढवले जाईल. मुख्य म्हणजे, या बेरजेनुसार या कालावधित प्रवासी या ‘क्रेडिट शेल’चा कधीही तिकिटासाठी उपयोग करेल. ते तिकीट तो दुसऱ्याला हस्तांतरीत देखील करू शकेल. मूळ तिकीट वेगळ्या मार्गाचे असताना अन्य मार्गाचे तिकीट काढण्याची मुभादेखील सर्वोच्च न्यायालयाने प्रवाशांना दिली आहे. मुख्य म्हणजे, त्यासाठी विमान कंपन्यांना कुठलेही अतिरिक्त मूल्य प्रवाशाकडून आकारता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे.

ग्राहक पंचायतचे अॅड. शिरीष देशपांडे म्हणाले, ‘प्रवाशाने ३१ मार्च २०२१ पर्यंत क्रेडिट शेल वापरले नाही तर, क्रेडिट शेलच्या रकमेवर वरील व्याजानुसार परतावा देणे विमानसेवा कंपन्यांना बंधनकारक आहे. प्रवाशांनी ऑनलाइन किंवा एजंटकडून तिकीट बूक केले असल्यास त्यांच्याकडून हे क्रेडिट शेल किंवा परतावा मिळवणे हा ग्राहकाचा हक्क असेल. तसेच क्रेडिट शेलची सवलत परदेशी विमानसेवा कंपन्यांना नाही, हेदेखील प्रवाशांनी ध्यानात घ्यावे.’

अशा स्पष्ट निर्देशांनंतरही अनेक कंपन्या प्रवाशांना परतावा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यासंबंधी ग्राहकांनी [email protected] या ई-मेलवर तक्रार करावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाची १ ऑक्टोबर २०२० रोजीच्या आदेशाची प्रत आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या ७ ऑक्टोबर २०२० रोजीच्या परिपत्रकाच्या प्रतीसह [email protected] या ई-मेलवर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-has-directed-the-refund-credit-shell-to-air-passengers/articleshow/79478710.cms