मुंबई बातम्या

क्षयरोग, कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी मुंबई पालिका करणार घरोघरी तपासणी – Sakal

मुंबईः कोरोनामुळे मागे पडलेल्या क्षयरोग आणि कुष्‍ठरोग तपासण्या पुन्हा एकदा करण्याचा सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्‍य विभागाने घेतला आहे. 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 दरम्‍यान संयुक्‍त मोहीम राबवण्यात येणार असून या दरम्यान घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्‍या परिसरामधील साधारपणे 12 लाख 12 हजार 693 घरातील 50 लाख 9 हजार 277 व्‍यक्‍तींची क्षयरोग आणि कुष्‍ठरोग तपासणी करण्‍यात येणार आहेत. या तपासणी अभियानासाठी महापालिकेची 3 हजार 451 पथके कार्यरत असणार आहेत. या पथकांद्वारे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्‍याने सकाळी 9 ते सायंकाळी 4 या दरम्‍यान भेटी देऊन क्षयरोग आणि कुष्‍ठरोग विषयक वैद्यकिय तपासणी केली जाणार आहे. घरातील व्‍यक्‍ती कामानिमित्‍त बाहेर असल्‍यास सदर पथक दिवसातील इतर वेळी भेट देऊन तपासणी करणार आहे.

अधिक वाचा- गुटख्याची वाहतूक करणारी आंतरराज्य टोळी अटकेत, 6 लाखांचा  गुटखा जप्त

प्राथमिक तपासणी दरम्‍यान आढळणाऱ्या क्षयरोग संशयित रुग्‍णांच्‍या बेडसंख्‍याची तपासणी करण्‍यासह क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी पालिकेच्‍या अगर सरकारी प्रयोग शाळेत मोफत केली जाणार आहे. तसेच क्ष-किरण चाचणी देखील निर्धारित करण्‍यात आलेल्‍या खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत केली जाणार आहे. यासाठी संशयित रुग्‍णाला विशेष ‘व्‍हाऊचर’ देण्‍यात येणार आहेत. ज्‍यामुळे संशयित रुग्‍णाला खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये जाऊन मोफत चाचणी करुन घेता येणार आहे. क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्‍या रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत.

या अभियनादरम्‍यान आढळून येणाऱ्या कुष्‍ठरोग संशयितांना नजिकच्‍या रुग्‍णालयात संदर्भित करण्‍यात येणार आहे. तर कुष्‍ठरोग संशयितांची तपासणी ही वैद्यकिय अधिका-यांमार्फत करण्‍यात येणार आहे. 14 दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, दोन आठवडयांपेक्षा अधिक काळ ताप असणे किंवा सायंकाळच्‍या वेळेस ताप येणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीमधून रक्‍त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सूज असणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळून आल्‍यास संबंधितानी तातडीने पालिकेच्‍या किंवा सरकारी रुग्‍णालयातून क्षयरोगाची चाचणी करवून घ्‍यावी. ही चाचणी पूर्णपणे मोफत असल्याची माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कुष्ठरोगाची ही आहेत लक्षणे

त्‍वचेवर फिकट- लालसर चट्टा असणे, त्‍याठिकाणी घाम न येणे, जाड-बधिर- तेलकट चकाकणारी त्‍वचा, कानाच्‍या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर आणि तळपायावर मुंग्‍या येणे, बधिरपणा आणि जखमा असणे, त्‍वचेवर थंड आणि गरम संवेदना न जाणवणे, हाताची आणि पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, हात आणि पायांमध्‍ये अशक्‍तपणा जाणवणे, हातातून वस्‍तू गळून पडणे, चालताना पायातून चप्‍पल गळून पडणे अशी कुष्ठरोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळून आल्‍यास कुष्‍ठरोगाची तपासणी करवून घेण्याचे आवाहन ही डॉ गोमारे यांनी केले.

———————-

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai BMC conduct door to door inspection for control of tuberculosis and leprosy

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-bmc-conduct-door-door-inspection-control-tuberculosis-and-leprosy-378785