मुंबई बातम्या

“दिशा सालियानच्या मृत्यूची CBI चौकशी करावी”; मुंबई उच्च न्यालयाने याचिका फेटाळली – Sakal

मुंबई, ता. 26 : सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूची CBI चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. दिशाच्या मृत्यूबाबत जर काही माहिती असेल तर ती मुंबई पोलिसांकडे जाऊन देऊ शकतात, असेही न्यायालयाने सूचित केले. 

सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी दिशाचा मालाडमधील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुशांत आणि तिच्या मृत्यूमध्ये सामायिक धागा असून दोन्ही मृत्यू एकमेकांशी निगडित आहेत, त्यामुळे दिशाच्या मृत्यूची देखील सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका वकील पुनित धांडा यांनी एड. विनित धांडा यांच्यामार्फत केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईत कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप

याचिकादारांना अशी मागणी करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. जर का दिशाच्या मृत्यूमध्ये काही गैरप्रकार वाटत असेल, तर तिचे कुटुंबिय त्यासाठी दाद मागू शकतात, असे खंडपीठाने सुनावले. मुंबई पोलिसांनी 5 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे की, दिशाच्या मृत्यूबाबत काही माहिती असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पण याचिकादार पोलिसांकडे गेल्याचे दिसत नाही. त्याऐवजी ते थेट सर्वोच्च न्यायालयात गेले, असेही खंडपीठ म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी नकार दिला होता.

महत्त्वाची बातमी : २०१९ विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांचा मेसेज घेऊन वर्षावर गेले होते ? नवाब मलिकांनी दिलं उत्तर

सुशांत आणि दिशा या दोघांच्या मृत्यूबाबत संभ्रम आणि संशयाचे वातावरण आहे आणि अनेक बातम्या माध्यमांमध्ये निर्माण होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच्या आत्महत्येचा तपास CBI कडे वर्ग केला आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूचा तपासही सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी याचिकादाराकडून करण्यात आली. मात्र न्यायालयाने याचिका नामंजूर केली आणि हवे असल्यास याचिकादार मुंबई पोलिसांकडे जाऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे.

( संपादन – सुमित बागुल )

bombay high court dismissed the petition to seek CBI enquiry for death of disha salian

Source: https://www.esakal.com/mumbai/bombay-high-court-dismissed-petition-seek-cbi-enquiry-death-disha-salian-377634