मुंबई बातम्या

मुंबई विमानतळावर तब्बल 18 कोटींचे कोकेन जप्त, आफ्रिकेतील तस्कराला बेड्या – TV9 Marathi

मुंबई : डीआरआय विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पश्चिम आफ्रिकेच्या ड्रग्ज तस्कराकडून तब्बल 18 कोटी रुपयांचे कोकेन (Cocaine) जप्त केले आहे. डीआरआय विभागाची दहा दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई आहे. जप्त केलेल्या कोकेनचे वजन 2 किलो 935 आहे. (Cocaine worth Rs 18 crore has been seized from drug smugglers in Mumbai)

आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत तब्बल 18 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनी येथील रहिवासी असलेल्या ड्रग्ज तस्कराला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केल्याने ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईवरुन एक ड्रग्ज तस्कर आपल्यासोबत कोकेन घेऊन मुंबईत येत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या डीआरआयच्या विभागाला मिळाली. हे कळताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानंतर ड्रग्ज तस्कर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेला ड्रग्ज तस्कर मूळचा पश्चिम आफ्रिकेतील गिनी येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे नाव मुसा आहे.

तस्कराकडे तब्बल 18 कोटींचे कोकेन

डीआरआयच्या आधिकाऱ्यांनी तस्कराला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडचे 2 किलो 935 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 18 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

दहा दिवसांतील दुसरी मोठी कारवाई

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मुंबई शहरातील ड्रग्ज तस्करांचे जाळे हळूहळू समोर येत आहे. ड्रग्ज तस्करांचे हे जाळे समोर आणण्यामध्ये डीआरआय विभागाचे मोठे योगदान आहे. मागील दहा दिवसांमध्ये डीआरआयने केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. आतापर्यंत विभागाने तब्बल 4 किलो कोकेन जप्त केलेले आहे. या 4 किलो कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 27 कोटी रुपये आहे.

दरम्यान, ‘सध्या जप्त करण्यात आलेले कोकेन पाहता मुंबई शहरात ड्रग्ज तस्करांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. सध्या जप्त केलेल्या कोकेनवरुन कोकेनची मागणी वाढली असल्याचे स्पष्ट होते. डीआरआय विभाग या ड्रग्ज तस्करीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे,’ असे डीआरआयच्या मुंबई विभागाने सांगितले. (Cocaine worth Rs 18 crore has been seized from drug smugglers in Mumbai)

संबंधित बातम्या :

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर, कागदपत्रांची पूर्ती करून भारती-हर्ष घरी जाण्यासाठी रवाना

ड्रग्ज प्रकरणातील कोरोना पॉझिटीव्ह आरोपीचे रुग्णालयातून पलायन; मुंबई पोलिसांची शोधाशोध

दहशत माजविण्यासाठी स्थानिक गावगुंडाकडून घरातील सामान, गाड्यांची तोडफोड, कल्याण पूर्वेतील प्रकार

[embedded content]

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/crimes/cocaine-worth-rs-18-crore-has-been-seized-from-drug-smugglers-in-mumbai-328002.html