मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठातील अस्थायी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन – मुंबई लाइव्ह

मुंबई विद्यापीठातील स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणं अस्थायी कर्मचाऱ्यांनाही विविध सवलती मिळाव्यात यासाठी गेली अनेक वर्षे विद्यापीठाशी चर्चा सुरू आहे. अस्थायी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वर्षांनुवर्षे पत्रव्यवहार करूनही मुंबई विद्यापीठ प्रशासन दाद देत नसल्यानं विद्यापीठातील तब्बल १२०० अस्थायी कर्मचारी साखळी धरणे आंदोलन करणार आहेत. सोमवार २३ नोव्हेंबरपासून या आंदोलनाला केलं जात आहे.

पुढील ७ दिवस विद्यापीठ आवारात हे आंदोलन केलं जाणार आहे. आरोग्य विमा, अधिकृत ओळखपत्र, वेतनवाढ, नैमित्तिक रजा, निर्वाह निधी अशा अनेक समस्यांबाबत विद्यापीठ प्रशासनाला वारंवार सूचित करूनही त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळं आता विद्यापीठ आवारातच ७ दिवस धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

साखळी स्वरूपात हे आंदोलन होणार असून सामाजिक अंतर राखण्यासाठी, तसंच, गर्दी टाळण्यासाठी दर दिवशी नियोजित विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते. ‘सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आरोग्य विमा, प्रवास सुरळीत व्हावा यासाठी अधिकृत ओळखपत्र, वेतन पावती, कामानुसार अतिरिक्त भत्त्यात वाढ, शैक्षणिक पूर्तता असलेल्या कर्मचाऱ्यांना रोजंदारीवरून एकत्रित वेतनावर घेणं, २००९ ते २०१६ या ८ वर्षांचा थकीत निर्वाह निधी, नैमित्तिक रजा आणि वैद्यकीय रजेचा अधिकार, कार्यालयीन वेळेत अपघात झाल्यास कर्मचाऱ्यांना कुलगुरू फंडातून मदत, महिला कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघराची व्यवस्था’ आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही घोषणाबाजी न करता विद्यापीठ कामकाजाच्या विरोधात फलक दाखवून शांततेत निदर्शन केले जाण. कर्मचारी आपले काम सांभाळून दुपारी १ ते २च्या दरम्यान या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Source: https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-university-agitation-of-temporary-employees-from-today-58233