मुंबई बातम्या

Mumbai Delhi Flights: मुंबई-दिल्ली रेल्वे, विमानसेवा थांबवणार!; राज्य सरकार उचलणार ‘हे’ मोठे पाऊल – Maharashtra Times

मुंबई: दिल्लीत करोना संसर्गाची दुसरी लाट धडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार सतर्क झालं असून दिल्लीशी तूर्त संपर्क तोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. ( Mumbai Delhi Flights and Trains Latest News Updates )

वाचा: करोना: दिल्लीचा व्हिडिओ शेअर करून बीएमसी आयुक्तांचं मुंबईकरांना ‘हे’ आवाहन

मुंबईने करोनाचा क्रूर चेहरा पाहिलेला आहे. मुंबई देशातील करोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला होता. हे संकट हळूहळू दूर होत असताना व स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली असताना दिल्लीत आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने मुंबईकरांचीही धाकधूक वाढली आहे. त्यात आधीच दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाची दुसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी वेळीच पावले उचलली जात आहेत. त्यातूनच दिल्ली-मुंबई प्रवास तूर्त बंद केला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

वाचा: ठाकरे सरकारला बसणार वीजबिलाचा झटका; भाजपने दिली ‘ही’ हाक

दिली -मुंबई विमानसेवा आणि रेल्वेसेवा पुढचे काही दिवस बंद ठेवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी माहिती दिली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्ली-मुंबई विमानसेवा तसेच रेल्वेसेवा बंद ठेवता येईल का, याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. तसा प्रस्तावही असून तूर्त त्यावर केवळ चर्चा सुरू आहे. यात राज्य सरकारसोबतच रेल्वे, नागरी उड्डाण विभाग यांचीही परवानगी आवश्यक असल्याने संबंधितांशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे, असेही संजयकुमार यांनी स्पष्ट केले.

वाचा: टोलमध्ये महत्त्वाचा बदल; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय

मुंबई झाली सतर्क

दिल्लीत करोना नियंत्रणात आल्यानंतर २८ ऑक्टोबरपासून अचानक स्थिती बदलली आहे. २८ ऑक्टोबर रोजी दिल्लीत दैनंदिन करोनारुग्णांची संख्या ५ हजारावर जाऊन पोहचली. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत असून ११ नोव्हेंबर रोजी ८ हजार ५०० इतकी विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली गेली. काल दिवसभरात दिल्लीत ७ हजार ५४६ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे दिल्लीतील एकूण रुग्णसंख्या ५ लाख १० हजार ६३० वर पोहचली आहे. आरोग्य विभागाच्या मते काल ६ हजार ६८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण ४ लाख ५९ हजार ३६८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. दुसरीकडे दिवाळीनंतर मुंबईतील करोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळेच मुंबई पालिका प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार वेळीच सावध होऊन पावले टाकताना दिसत आहे.

वाचा: राज्यात पुन्हा धोका वाढला?; दिवसभरात १५४ करोना रुग्ण दगावले

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/flights-and-trains-to-mumbai-may-be-suspended-as-covid-19-cases-spike-in-delhi/articleshow/79321392.cms