मुंबई बातम्या

कुत्र्याचं नाव गोवा असं का ठेवलं?; रतन टाटांनी त्या कमेंटला दिला रिप्लाय – Loksatta

टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या समृद्ध औद्योगिक वारश्याबरोबरच दातृत्वासाठी, श्वानप्रेमासाठी, साधेपणसाठीही ओळखले जातात. रतन टाटा मागील काही महिन्यांपासून सोशल नेटवर्किंगवरही सक्रीय झाले आहेत. ते इन्स्टाग्रामवरुन वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्याबद्दलची माहिती आणि पूर्वी कधीही समोर न आलेले त्यांच्या आठवणींमधील फोटो पोस्ट करत असतात. रतन टाटा हे त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांबद्दल सोशल नेटवर्किंगवरुन चाहत्यांना रंजक माहिती देत असतात. असाच एक फोटो त्यांनी नुकताच शेअर केला.

रतन टाटा हे मुंबईमधील बॉम्बे हाऊसमध्ये राहतात.  रतन टाटा यांना कुत्र्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. अनेक प्राणी मित्र संघटनांना ते मदत करत असतात. त्यांच्या बॉम्बे हाऊसमध्येही दोन जर्मन शेफर्ड कुत्र्यांबरोबरच काही दत्तक घेतलेले कुत्रेही आहेत. याच कुत्र्यांबरोबरचा एक फोटो रतन टाटांनी दिवाळी निमित्त शेअर केला आहे. बॉम्बे हाऊसमधील कुत्र्यांबरोबरच हे काही खास क्षण दिवाळीदरम्यानचे आहेत. यापैकी गोवा हा खूप खास आहे कारण तो मला ऑफिसमध्येही सोबत करतो, असं रतन टाटांनी म्हटलं आहे.

टाटांच्या या पोस्टवर एका चाहत्याने, तुमच्या कुत्र्याचं नाव गोवा आहे?, या नावामागे काही विशेष कारण किंवा किस्सा आहे का?, असा प्रश्न विचारला. सामान्यपणे सेलिब्रिटी आपल्या फॉलोअर्सला रिप्लाय देत नाहीत. मात्र इतर गोष्टींप्रमाणेच टाटा यामध्येही आपलं वेगळेपण कायमच दाखवतात. रतन टाटांनी कुत्राचं नाव गोवा ठेवण्यामागील गोष्ट या चाहत्याच्या कमेंटला रिप्लाय करुन सांगितली. “माझा एक सहकारी गोव्यावरुन त्याच्या कारने मुंबईला येत असताना रस्त्यावरील एक छोटं कुत्र्याचं पिल्लू त्याच्या गाडीमध्ये चढलं आणि ते थेट बॉम्बे हाऊसपर्यंत आलं. त्यामुळेच त्याचं नाव गोवा असं ठेवलं आहे,” अशी कमेंट टाटांनी केली. टाटांच्या या कमेंटला हजारोच्या संख्येने लाईक्स आहेत.रतन टाटा यांना त्यांचे कुत्रे फार प्रिय आहेत. त्यांची गाडी बॉम्बे हाऊसच्या दारात आली की पहिल्यांदा दारात बसलेल्या कुत्र्यांना आनंद होतो. समस्त टाटा कुटुंबियांना बॉम्बे हाऊसमधील या कुत्र्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. रतन टाटा यांची गाडी आली की हे कुत्रे त्यांच्या गाडीभोवती जमतात. गाडीतून उतरले की लोक काय म्हणतील वगैरे विचार न करता रतन टाटा त्यातल्या काहींना थोपटतात. लाड करतात आणि मग टाटा आपल्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी लिफ्टच्या रांगेत उभे राहतात. अनेकदा टाटा शनिवारी आपले दोन जर्मन शेफर्ड कुत्र्यांबरोबरच छोटया स्पीडबोटने अलिबागलाही जातात.

imageलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on November 19, 2020 11:45 am

Web Title: ratan tata celebrated diwali with bombay house dogs gives reason to name dog as goa scsg 91

Source: https://www.loksatta.com/trending-news/ratan-tata-celebrated-diwali-with-bombay-house-dogs-gives-reason-to-name-dog-as-goa-scsg-91-2332339/