मुंबई बातम्या

‘राव यांची व्हीसीद्वारे वैद्यकीय तपासणी करा’ – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील ८१ वर्षीय आरोपी वरवरा राव यांची विलेपार्लेमधील नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांकडून व्हिडिओ कॉलिंगद्वारे (व्हीसी) वैद्यकीय तपासणी होण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच तळोजा तुरुंग प्रशासन व राष्ट्रीय तपास यंत्रणेला (इडी) दिले. त्याचबरोबर व्हीसीद्वारे योग्य वैद्यकीय तपासणी शक्य होत नसल्याचे वाटल्यास किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी आवश्यक वाटल्यास नानावटीच्या संबंधित डॉक्टरांना तळोजा तुरुंगात जाऊन राव यांची वैद्यकीय तपासणी करता येईल. त्यासंदर्भात तुरुंग प्रशासनाने आवश्यक व्यवस्था करावी. त्यानंतर रुग्णालयाने १६ नोव्हेंबरपर्यंत राव यांच्या प्रकृतीचा सद्यस्थिती अहवाल न्यायालयाकडे ई-मेलद्वारे दाखल करावा, असे निर्देशही न्या. ए. के. मेनन व न्या. सुरेंद्र तावडे या दिवाळी सुटीकालीन खंडपीठाने दिले.

ज्येष्ठ तेलुगू कवी वरवरा राव यांच्या पत्नी पी. हेमलता राव यांनी अॅड. आर. सत्यनारायणन यांच्यामार्फत राव यांच्या जामिनावरील सुटकेसाठी याचिका केली आहे. हेमलता यांनी पूर्वी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगून उच्च न्यायालयाला लवकर निकाल देण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्यांनी याचिका करून राव यांच्या व्यक्तीस्वातंत्र्य व जगण्याच्या मूलभूत हक्कांचे व मानवी हक्कांचे सरकारकडून उल्लंघन होत असल्याचा निवाडा देण्याची विनंती केली आहे. ‘तुरुंगात योग्य काळजी घेतली जात नसल्याने राव यांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यामुळे पूर्वी उपचार झालेल्या नानावटी रुग्णालयातच त्यांना हलवावे आणि निष्णात डॉक्टरांचे मंडळ स्थापन करून प्रकृती अहवाल मागवावा’, असा तातडीचा विनंती अर्जही हेमलता यांनी केला. याविषयी गुरुवारी तातडीची सुनावणी झाली.

‘राव यांना विस्मरणाचा त्रास असून त्यांना सध्या डायपर लावावे लागत आहे. त्यांचे डायपरही नीट बदलले जात नाही. परिणामी त्यांना मूत्रसंसर्ग झाला आहे. त्यांच्या प्रकृतीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यांचा जीव जाऊ शकतो. तसे झाले तर हा कोठडीतील मृत्यूचा प्रकार ठरेल. त्यामुळे न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे’, असे म्हणणे हेमलता यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी मांडले. तर ‘राव यांची प्रकृती ठीक नाही, हे खरे आहे. मात्र, तुरुंग प्रशासनातील डॉक्टर हे नानावटीच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यांच्या प्रकृतीकडे सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक उपचार करत आहेत’, असे म्हणणे मांडत एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मांडले. अखेरीस तूर्तास व्हिडिओ कॉलिंगद्वारे अथवा प्रत्यक्ष तुरुंगातील तपासणीद्वारे प्रकृतीविषयीचा अहवाल मिळवणे योग्य होईल, यावर सर्वांची संमती झाल्यानंतर खंडपीठाने तसे निर्देश देऊन पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला ठेवली.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-directed-taloja-jail-administration-and-ed-to-manage-video-calling-medical-checkup-for-dr-varavara-rao-by-nanavati-hospital/articleshow/79213727.cms