मुंबई बातम्या

कुठे हरवला मुंबई- गोवा महामार्ग? | commuters suffers because of dust on mumbai goa highway video – Zee २४ तास

मुंबई : सततची वर्दळ, वाहनांची गर्दी आणि महत्त्वाचा रस्ता अशीच एकंदर परिस्थिती असणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गाची दुरावस्था आता आणखी बळावू लागली आहे. 

महामार्गावर सुरु असणारी कामं कधी पूर्णत्वास जाणार याकडेच सर्व प्रवासी आणि मुख्य म्हणजे चारकमान्यांचे डोळे लागले आहेत. पण, महामार्गाची सद्यस्थिती पाहता ही वाट खऱ्या अर्थानं आता अधिकच बिकट होताना दिसत आहे. 

मुंबई- गोवा महामार्गावरचा प्रवास म्हणजे धुळ आणि खड्डे हे समीकरणच झालं आहे. मागील काही वर्षांपारून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर भरावही घालण्याचं काम सुरु आहे. त्यातच सतत मोठ्या मालवाहतूक वाहनांचीही ये-जा सुरु आहे. त्यातच रस्त्याच्या कामांमुळं या भागात धुळीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. धुळीचं प्रमाण इतकं आहे की, त्यामध्ये महामार्ग आणि समोरील वाहनही अनेकदा दिसेनासं होत आहे. 

Diwali 2020 दिवाळीच्या निमित्तानं कोकणच्या दिशेनं निघालेल्या सर्व प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. फक्त धुळीचाच नव्हे, तर रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळंही प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळं बिकट झालेली कोकणची वाट आता धुळीमुळे आव्हानात्मक आणि त्रासदायक वाटू लागली आहेत. ज्यामुळं फक्त महामार्गच नव्हे तर आता प्रवाशांचाही श्वास गुदमरतोय. यावर लवकरात लवकर तोडगा काढत महामार्गाची परिस्थिती सुधारण्यात यावी, अशीच मागणी सर्व प्रवासी वर्गातून केली जात आहे. 

Source: https://zeenews.india.com/marathi/maharashtra/commuters-suffers-because-of-dust-on-mumbai-goa-highway-video/541254