मुंबई बातम्या

टीआरपी घोटाळा : राज्य सरकारसह मुंबई पोलीस आयुक्तांना उच्च न्यायालयाची नोटीस – Loksatta

मुंबई : ‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी हंसा रिसर्च ग्रुपने केलेल्या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने शनिवारी राज्य सरकारसह मुंबई पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी पुढील आदेशापर्यंत कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच केवळ दोन दिवस दोन तास चौकशीसाठी बोलावण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले.

पोलिसांकडून आक्षेपार्ह आणि बेकायदा पद्धतीने तपास केला जात असल्याचा आरोप करत ‘हंसा रिसर्च ग्रुप’ या कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची तसेच तपासाला स्थगिती देण्यासह पोलिसांना कोणतीही कठोर कारवाईपासून मज्जाव करण्याची मागणी केली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर कंपनीच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी कंपनीने केलेल्या आरोपांचे सरकार, पोलीस आयुक्त आणि दोन्ही अधिकाऱ्यांच्या वतीने अ‍ॅड्. देवदत्त कामत यांनी खंडन केले. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना केवळ चौकशीची गरज वाटल्यावरच बोलावण्यात आल्याचा दावा केला. त्यावर याचिकाकर्त्यांना चौकशीच्या नावाखाली कधीही बोलावू नका. याचिकाकर्ते हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत, आरोपी नाहीत. तसेच प्रकरणाचा तपास थांबवावा, असेही आमचे म्हणणे नाही. त्यामुळे त्यांना कारणाशिवाय पोलीस ठाण्यात बोलावले जाऊ नये, असे न्यायालयाने म्हटले. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना आठवडय़ातून दोन दिवस, दोन तास बोलवण्यात यावे, असे सांगितल्यावर कामत यांनी ते मान्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on November 8, 2020 1:50 am

Web Title: bombay hc notice to mumbai police commissioner along with state government in trp scam zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bombay-hc-notice-to-mumbai-police-commissioner-along-with-state-government-in-trp-scam-zws-70-2323193/