मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेकडून एसटीला ३० कोटी – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईकरांच्या सेवेत बेस्ट उपक्रमाच्या सहाय्यासाठी पाठविलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यासाठी पालिकेने आतापर्यंत ३० कोटी ७४ लाखांहून अधिक मोबदला मोजला आहे. लॉकडाउनपासून बेस्ट उपक्रम मुंबईकरांना सेवा देत आहेत. लॉकडाउन शिथील झाल्यानंतर बेस्टप्रवास खुला झाल्यानंतर आपसूकच सेवेवरील ताण वाढला. तेव्हा बेस्टमधील गर्दी पाहून एसटी महामंडळाच्या ताफ्यातील बससेवाही उपलब्ध करण्यात आल्या. मात्र, या सेवांसाठी येणाऱ्या खर्चाचा भार मुंबई पालिकेवर टाकण्यात आला होता. त्यानुसार पालिकेने एसटी महामंडळास ही रक्कम दिली.

बेस्ट बसेसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटीकडून हजार बसचा ताफा पाठविण्याची घोषणा करण्यात आली. बेस्ट उपक्रमाची आर्थिक क्षमता रोडावल्याने या खर्चाचा भार पालिकेवर आला आहे. त्यात एसटीच्या प्रत्येक बससाठी प्रतिकिमी ४४ रुपये इतका दर आकारण्यात आला आहे. एसटीची सेवा २१ मेपासून घेण्यात आली असून २ जुलैपर्यंत सुमारे ५० लाख किमी इतके अंतर झाले आहे. त्यासंदर्भात बेस्टकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य प्रवाशांकडून भाड्यापोटी पाच कोटी ५९ लाखांवर रक्कम मिळाली आहे. त्याप्रमाणे ६ मे ते ३ जुलैपर्यंत नऊ कोटी ६५ लाख आणि २१ मे ते २ जुलैसाठी १६ कोटी नऊ लाखांवरील रक्कम मिळून ३० कोटी ७४ लाख रुपये महामंडळास देण्यात आले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipal-corporation-has-given-30-crore-rupess-to-st-corporation-for-service/articleshow/78985066.cms