मुंबई बातम्या

मोठी बातमी : मुंबई पोलिसांना आता मिळणार बॉडी कॅमेरे – सरकारनामा

मुंबई : काळबादेवी परिसरात एका महिलेने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणावरुन मोठा गदारोळ सुरू असताना असे प्रकार थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेसह इतर देशांतील पोलिसांप्रमाणे मुंबईतील वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी सादविका रमाकांत तिवारी (वय 30, रा. मशीद बंदर) आणि मोहसीन निजामउददीन खान (26, रा. भेंडी बाजार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे. कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे वाहतूक पोलिस हवालदार एकनाथ पारठे हे कर्तव्य बजावत असताना सादविका या महिलेसोबत एक व्यक्ती होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करून वाहतूक हवालदार पारठे यांना मारहाण केली. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अटक केलेल्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.  

या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत महिला ही वाहतूक पोलिसाने शिवी दिल्याचा दावा करत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलेने रस्त्यावर लोकांना जमवून वाहतूक पोलिसांला मारहाण केली. पोलिसांनी या आरोपांचे खंडन केले आहे. महिलेला कोणत्याही प्रकारची शिवी दिली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. 

या प्रकरणानंतर पोलीस दलासह सर्वसामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कायद्याच्या रक्षकांवर हल्ले होत असल्याने असे प्रकार थांबवण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे. मुंबई पोलिसांनी आता असे प्रकार थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक शाखेच्या सहआयुक्तांनी वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्याची घोषणा केली आहे. 

वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे मिळाल्यास नियमांचे उल्लंघन करणारे तसेच, हुज्जत घालणारे आणि मारहाण करणाऱ्यांचे चित्रण त्यात होईल. यातून अशा व्यक्तींवर कारवाई करता येईल. अमेरिकेसह युरोपातील देशांमध्ये पोलिसांना बॉडी कॅमेरे दिलेले असतात. यात पोलिसांच्या कारवाईवर देखरेख ठेवण्यासोबत गुन्हेगारांशी होणाऱ्या चकमकीचे चित्रणही होते. याआधी बंगळूरमधील वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्यात आले होते. आता मुंबई पोलिसांना बॉडी कॅमेरे मिळाल्याने त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Source: https://www.sarkarnama.in/vishleshan/we-will-give-body-cameras-our-personnel-posted-here-says-joint-commissioner-mumbai-police