मुंबई बातम्या

‘टीव्ही टुडे’ला सशर्त संरक्षण – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

इंडिया टुडे व आज तक या वृत्तवाहिन्यांच्या दररोजच्या सरासरी प्रेक्षकसंख्येत अचानक वाढ झाल्याचे दिसून आल्याने ब्रॉडकास्टर्स ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने (बार्क) समज दिलेले पत्र आणि पाच लाख रुपयांच्या लावलेल्या दंडाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या टीव्ही टुडे नेटवर्क लिमिटेडला ५ नोव्हेंबरपर्यंत सशर्त संरक्षण मिळाले आहे. बार्कने लावलेल्या दंडाची पाच लाखांची रक्कम न्यायालयात जमा केली तरच पुढील कठोर कारवाईपासून संरक्षण मिळेल, असे न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी गैरप्रकार केला आणि आचारसंहितेचा भंग केला, या आरोपासंदर्भात ‘बार्क’च्या शिस्त मंडळाने कंपनीला पूर्वी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. तसेच त्यानंतर ३१ जुलै रोजी पाच लाख रुपयांच्या दंडाचा आदेश काढून समज देणारे पत्रही दिले. त्यामुळे कंपनीने त्याला रिट याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. ‘बार्कने असा आदेश काढताना आरोप सिद्ध होणारे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे आदेश चुकीचा आहे’, असा युक्तिवाद कंपनीतर्फे मांडण्यात आला. तर, ही याचिका सुनावणीयोग्यच नसल्याचा युक्तिवाद ‘बार्क’ने मांडला. अखेरीस खंडपीठाने यावर ५ नोव्हेंबर रोजी सविस्तर सुनावणी घेण्याचे निश्चित केले. तसेच ‘कंपनीला आपल्या हक्कांवर कोणताही परिणाम न होता दंडाची रक्कम न्यायालयात जमा करण्याची मुभा आहे. तसे कंपनीने केले तर पुढील सुनावणीपर्यंत कंपनीविरोधात कोणतीही कठोर कारवाई होणार नाही’, असे खंडपीठाने गुरुवारी आपल्या आदेशात स्पष्ट केले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-has-give-conditional-protection-to-tv-today-till-5-november/articleshow/78848304.cms