मुंबई बातम्या

करोनामुळे १० हजारांपेक्षा अधिक मृत्यू झालेले मुंबई हे देशातील पहिले शहर! – Loksatta

करोना प्रादुर्भावाचा वेग देशभरास राज्यात काहीसा मंदावल्याचे दिसत असले, तरी देखील अद्यापही नव्या करोनाबाधितांसह करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होताना दिसतच आहे. राज्यात मुंबई व पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत काल(शनिवार) १हजार २५७ नवे करोनाबाधित आढळले. तर, एकट्या मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये काल ५० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. एकूण मृत्यूंपैकी ८५ टक्के मृत्यू हे ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या रुग्णांचे असल्याचेही समोर आले आहे.

करोनामुळे १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झालेले मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे. मुंबईतील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या काल १० हजार १६ वर पोहचली होती. तर, एकूण करोनारुग्णांची संख्या २ लाख ५० हजार ६१ वर पोहोचली आहे. तर, बीएमसीच्या आकडेवारीनुसार काल ८९८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण २ लाख १९ हजार १५२ जण मुंबईत करोनामुक्त झाले आहेत.
बीएमसीने सांगितल्याप्रमाणे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्य़ांवर पोहचले आहे. तर रुग्ण दुप्पटीचा काळ सरासरी १२० दिवसांवर पोहोचला आहे. कालपर्यंत १४ लाख ३७ हजार ४४५ नमूने तपासणी झालेली आहे.

आकडेवारीवरून असे देखील दिसून येते की, मुंबईत ८ हजार ५८५ इमारतींसह ६३३ अॅक्टिव कंटेनमेंट झोन आहेत. जे करोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने सील करण्यात आलेले आहेत. कालपर्यंत मुंबईत १९ हजार ५५४ अॅक्टिव केसेस होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on October 25, 2020 9:38 am

Web Title: mumbai is first indian city with over 10000 covid deaths msr 87

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-is-first-indian-city-with-over-10000-covid-deaths-msr-87-2310580/