मुंबई बातम्या

मुलाचा अट्टाहास झाला कमी, मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनात मुंबई अव्वल – Sakal

मुंबई : मुलगाच हवा समाजातीतल हा अट्टाहास कमी झाल्याचे सकारात्मक  चित्र समोर आले आहे. इंटरनॅशनल इंन्स्टिट्यूट फॉर पॉप्यूलेशन सायन्सच्या संशोधनातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. महत्वाचे म्हणजे मुलींच्या जन्मानंतर ही कुटूंब नियोजनाचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक असल्याचेही या अहवालात नोंदवण्यात आल्याची माहिती मुंबईच्या लोकसंख्याशास्त्र संस्थेचे प्रमुख प्रा. हरिहर साहू यांनी दिली.

राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षणात 1992 ते 2016 पर्यंतच्या आकडेवारीचा विचार करण्यात आला आहे.  राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षणात सहभागी 8 लाख 88 हजार कुटूंबातील 9 लाख 99 हजार विवाहीत महिलांशी झालेल्या चर्चेतून हा निष्कर्ष समोर आला आहे. या कुटूंबाचे वर्गीकरण ग्रामिण आणि शहरी तसेच निरक्षर, प्राथमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण, धार्मिक आणि जातीय आधारावर करण्यात आले आहे. 

महत्त्वाची बातमी : देशद्रोह आरोप प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंगनाला समन्स; सोमवारी चौकशीस हजर राहण्याच्या सूचना

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार दोन मुली आणि मुलगा नसलेल्या 33.6 टक्के घरात कुटूंब नियोजनाच्या पद्धतींचा अवलंब झाला किंवा कुटूंब दोन मुलींपुरतेच सिमीत ठेवण्याचा निर्णय झाला. 

गावांच्या तुलनेत शहरांमध्ये एक मुलगी असलेले कुटूंबे 25 टक्के जास्त 

 • अल्पशिक्षित कुटूंबांच्या तुलनेत उच्च शिक्षित कुटूंबात फक्त मुलीच असलेले कुटूंब मर्यादीत ठेवण्याची इच्छा 1.6 ते 2.2 पट जास्त आढळली.
 • शहरांच्या तुलनेत गावांत राहणाऱ्या दांपत्यांत फक्त मुलींपर्यंतच कुटूंब मर्यादीत ठेवण्याची इच्छा 25 टक्के कमी.
 • महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगालच्या मुस्लिम कुटूंबात हिंदूंच्या तुलनेत फक्त मुली असलेले कुटुंब अनुक्रमे 26 टक्के, 35 टक्के आणि 37 टक्के कमी आढळली.  
 • महाराष्ट्रात एक मुलगी असलेली कुटूंबे 26 टक्के, दोन मुलींची कुटूंबे 63.4 टक्के आणि तीन मुलींची कुटूंबे 71.5 टक्के आहेत. 

मुंबई अव्वल – एका मुलीनंतर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेण्याचे प्रमाण हे 16.2 टक्के इतके आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रमाण 8 टक्के इतके आहे. मुंबईत दोन मुलींनंतर कुटूंब नियोजनाचा निर्णय घेण्याचे प्रमाण 68.8 टक्के, 3 मुलींनंतर 100 टक्के प्रमाण आहे. राज्यात एका मुलीनंतर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेण्याचे प्रमाण हे मुंबईत सर्वाधिक आहे.   

महत्त्वाची बातमी : नाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार ?

मुंबईत मुलगा नसलेल्या कुटुंबाचे  प्रमाण 3 टक्के आहे. तर केवळ मुलगा असलेल्या कुटूंबाचे प्रमाण हे 26 टक्के आहे. मुलगा आणि मुलगी असलेल्या कुटुंबाचे प्रमाण हे 56 टक्के इतके आहे.

इतर शहरांतील प्रमाण

 • मुंबई उपनगर – 13 टक्के
 • ठाणे – 10 टक्के 
 • पुणे – 9 टक्के 
 • नाशिक – 5 टक्के
 • नागपूर – 10.4 टक्के 
 • वर्धा – 12.8 टक्के 
 • गोंदीया – 12.8 टक्के 

10 वर्षात या राज्यांत झाली सर्वाधिक वाढ

 • केरळ – 16.8 टक्के
 • तामिळनाडू – 10.8 टक्के
 • हरियाणा  – 20 टक्के
 • महाराष्ट्र – 10 टक्के
 • पंजाब – 8 टक्के

( संपादन – सुमित बागुल )

bombay is on top when it comes to take decision of family planning after birth of daughter

Source: https://www.esakal.com/mumbai/bombay-top-when-it-comes-take-decision-family-planning-after-birth-daughter-362229