मुंबई बातम्या

मुंबई मेट्रो सेवा आजपासून! ‘हे’ आहेत प्रवासाचे नियम – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

लॉकडाउनमुळे जवळपास सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रोसेवा अखेर आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रो फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून, सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेतच मेट्रो धावेल. सध्या ही सेवा ५० टक्के फेऱ्यांसह सुरू राहील. मात्र गरज भासल्यास या वेळेत वाढ केली जाईल, असे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयानंतर मुंबईतील प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागताच सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोची सेवा अमर्यादित काळासाठी खंडित करण्यात आली होती. मात्र राज्य शासनाच्या ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लोकल सुरू होताच, मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत देखील मागणी जोर धरू लागली. अखेर बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाकडून मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने देखील लगोलग सुरक्षा साधनांची पडताळणी करत सोमवारी सेवा पूर्ववत करत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आज, सोमवारपासून मेट्रो सामान्य मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल. विशेष म्हणजे, मेट्रो प्रवास सर्वांसाठी खुला असणार आहे. दररोज मेट्रोच्या २०० फेऱ्या होतील. तर, सुरक्षित वावराचा (सोशल डिस्टन्सिंग) विचार करता प्रत्येक फेरीत ३०० जण प्रवास करू शकतील.

मेट्रोमधून प्रवास करताना प्रवाशांना करोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असेल. प्रवास सुरू करण्यापूर्वी अस्वस्थ वाटत असल्यास किंवा आवश्यकता नसल्यास मेट्रोने प्रवास करू नये. तसेच ६५ वर्षांवरील आणि १० वर्षांखालील प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय, मेट्रो स्थानकात थांबण्याची वेळ ३० ते ६० सेकंदांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी मेट्रो एका स्थानकावर १५ ते २० सेकंद थांबत असे. प्रत्येक मेट्रो स्थानकावर आत आणि बाहेर जाण्यासाठी सध्या केवळ एकच मार्ग खुला राहणार आहे.

प्रवाशांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दर दोन तासांनी स्थानकांवरील सर्व टच पॉइंट्स निर्जंतुक केले जातील. तर, प्रत्येक फेरीनंतर मेट्रो डब्यांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मोबाइल फोनमध्ये आरोग्यसेतू अॅप्लिकेशन डाउनलोड करणे बंधनकारक असेल. मेट्रोत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग होईल. तर, ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक असेल. मेट्रोच्या तिकिटासाठी यापूर्वी प्लास्टिक टोकन दिले जात होते. मात्र मानवी संपर्क टाळण्यासाठी ही पद्धत बंद करून कागदी तिकीट आणि मोबाइल तिकिटाचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.

हे प्राथमिक नियम…

गर्दीच्या वेळी शक्यतो प्रवास टाळावा. कोविडची लक्षणे असलेल्या प्रवाशांना प्रवेश निषिद्ध असेल. मेट्रोसह स्थानकांवर मास्क घालणे अनिवार्य आहे. प्रवेशद्वारांवर थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य आहे. सुरक्षित वावराचे नियम पाळावे. मेट्रोमध्ये जास्त साहित्य आणि धातूच्या वस्तू घेऊन जाऊ नये. प्रवासासाठी स्मार्ट कार्ड, क्यूआर तिकिटे आणि मोबाइल तिकिटे वापरावे. आरोग्य सेतूचा वापर बंधनकारक.

– गर्दीच्या वेळी साडेसहा मिनिटांनी, तर गर्दी नसलेल्या वेळेत दर आठ मिनिटांनी एक फेरी

– प्रत्येक फेरीत ३०० प्रवासी प्रवास करू शकतील.

– प्रत्येक स्थानकावर मेट्रो थांबण्याचा कालावधी २० ते ४० सेकंदांनी वाढविल्याने घाईगडबड न करता सहज आत जाता येईल.

– प्लास्टिक टोकनऐवजी कागदाच्या तिकिटाला प्राधान्य

– स्मार्टकार्डमध्ये मार्चपूर्वी शिल्लक असलेली रक्कम तिकिटासाठी उपयोगात आणता येणार.

– स्टेशनवर आणि मेट्रोच्या आत चिन्हांकित ठिकाणी उभे राहावे.

हरवलेल्या वस्तूंसाठी…

प्रवाशांना यासंदर्भात काही माहिती हवी असल्यास मुंबई मेट्रोच्या ०२२-३०३१०९०० या क्रमांकावर सकाळी ७.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत संपर्क साधता येणार आहे. हरवलेल्या वस्तूंबाबत चौकशी करण्यासाठीचे केंद्र (Lost and Found center) दुपारी १२ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजपर्यंत खुले राहील.

मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश करताना सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून निवडक मार्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवेश तसेच बाहेर पडण्याच्या मार्गांची सविस्तर माहिती..

स्थानकाचे नाव – प्रवेश करण्याचा मार्ग – लँडमार्क – बाहेर पडण्याचा मार्ग

घाटकोपर : २ए (सरकता जिना) आणि २बी पादचारी पूल (भारत कॅफे) – घाटकोपर गेस्ट हाऊस – २ए (फिरता जिना) आणि २बी पादचारी पूल (भारत कॅफे)

जागृती नगर : १ – मुख्य प्रवेशद्वार – १

असल्फा : २ आणि ३ (सरकता जिना) – मंदिरासमोर – ४

साकीनाका : १ (सरकता जिना) आणि २ – ब्ल्यू स्टार जवळ – ५ आणि ६ (सरकता जिना)

मरोळ नाका : ३ – पर्ल अकॅडेमी – २

एयरपोर्ट रोड : १ (सरकता जिना) आणि २ – लीला बिझनेस पार्क – ६

चकाला/जेबी नगर : १ आणि २ (सरकता जिना) – कोटक महिंद्रा बँक/कोहिनूर ओरिएंटल – ६

पश्चिम द्रुतगती मार्ग : १ – महामार्गापासून पहिले प्रवेशद्वार – ६ आणि ७

अंधेरी : ५डी आणि पश्चिम रेल्वे पादचारी पूल – प्रसादम हॉटेल – ५सी आणि पश्चिम रेल्वे पादचारी पूल

आझाद नगर : १ आणि २ (सरकता जिना) – अंधेरी क्रीडा संकुल – ६

डीएन नगर : ४ आणि ५ (सरकता जिना) – इंडियन ऑइल जंक्शन – ३

वर्सोवा : १ – वर्सोवा डेपो – ६

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/metro-service-has-started-from-today-after-seven-months-in-mumbai/articleshow/78735256.cms