मुंबई बातम्या

तेजसला पायघड्या, मुंबई लोकलची कोंडी!; गोयल ‘मुंबईद्रोही’ म्हणत गंभीर आरोप – Maharashtra Times

मुंबई: मुंबईतील लोकलसेवा हळूहळू पूर्ववत व्हावी म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकार सकारात्मक पावले टाकत असताना त्याला रेल्वेकडून मात्र खो घातला जात आहे. सर्व महिलांसाठी लोकलसेवा खुली करण्यात यावी, असे राज्य सरकारने सांगितल्यानंतर रेल्वेने मात्र त्यावर तातडीने निर्णय न घेता रेल्वे बोर्डाकडे बोट दाखवले आहे. या संपूर्ण प्रकारावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचा ‘मुंबईद्रोही’ असा उल्लेख करत भाकपचे मुंबई कौन्सिलचे सचिव कॉ. प्रकाश रेड्डी यांनी गंभीर आरोप केले आहेत. ( Prakash Reddy Targets Railway Minister Piyush Goyal )

वाचा: घटस्थापनेचा मुहूर्त टळला!; महिला प्रवाशांच्या लोकल प्रवासात ‘हे’ विघ्न

महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांकडून पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला शुक्रवारी एक पत्र पाठवण्यात आले. या पत्रात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात धावत असलेल्या लोकल गाड्यांमधून सर्व महिला प्रवाशांना १७ ऑक्टोबरपासून प्रवासाची अनुमती देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. गर्दी टाळता यावी म्हणून दुपारी ११ ते ३ वाजेपर्यंत आणि रात्री सात वाजल्यानंतर प्रवास करता येईल व त्यानुसार आपण निर्णय घ्यावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले. यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिलांसाठी लोकलची दारे उघडणार, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र रेल्वेने तातडीने यावर निर्णय न घेता आडमुठेपणाची भूमिका घेतली. रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव आम्ही पाठवत आहोत. त्यांनी मंजुरी दिल्यानंतरच पुढे जाता येईल, असे उत्तर रेल्वेकडून राज्य सरकारला देण्यात आले. यावर भाकपने जोरदार आक्षेप घेतला आहे.

वाचा: Unlock 5: मुंबई मेट्रोला हिरवा कंदील; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

प्रकाश रेड्डी यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडले. एकीकडे महिला प्रवाशांना लोकल प्रवास नाकारला जात असताना दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद धावणारी खासगी तेजस एक्स्प्रेस मात्र आजपासूनच सुरू करण्यात आली. खुद्द रेल्वेमंत्री पीयुषय गोयल यांनी ट्वीट करून याबाबत घोषणा केली. रेल्वे मंत्रालय आणि रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे हे कृत्य उच्चवर्गीयांची दलाली करणारं आणि मुंबईतील नोकरदार कष्टकरी वर्गाशी द्रोह करणारं आहे, अशा शब्दांत रेड्डी यांनी निशाणा साधला.

वाचा: क्वारंटाइनबाबत सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ प्रवाशांना मिळणार दिलासा

मुंबईत सध्या नोकरदार वर्गाला कामावर जाण्यासाठी चार-चार तास प्रवास करावा लागत आहे. त्यातून आर्थिक भुर्दंडही पडत आहे, असे नमूद करताना जर तेजस एक्स्प्रेस सुरू होते, रिलायन्सची मेट्रो सुरू होते तर मग महिलांसाठी लोकल का सुरू करता येत नाही?, असा सवाल रेड्डी यांनी विचारला. पीयुष गोयल हे खासगीकरणासाठी काम करत आहेत व महाराष्ट्र सरकारची जाणूनबुजून अडवणूक करत आहेत, असा आरोपही रेड्डी यांनी केला. राज्य सरकारची सूचना मान्य करून महिलांसाठी लोकल तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणीही रेड्डी यांनी केली.

वाचा: खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही मिळणार लोकल प्रवासाची मुभा

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-local-train-prakash-reddy-targets-railway-minister-piyush-goyal/articleshow/78718869.cms