मुंबई बातम्या

Mumbai Metro: मुंबईत टप्प्याटप्प्याने मेट्रो सुरू होणार, पाहा काय होणार सुरू आणि काय राहणार बंद – Times Now Marathi

मुंबई मेट्रो (फाईल फोटो)&  | & फोटो सौजन्य:&nbspBCCL

थोडं पण कामाचं

  • अनलॉक संदर्भात राज्य सरकारकडून नवं परिपत्रक
  • सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी
  • उद्यापासून राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी

मुंबई : मुंबईतील चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, मुंबईतील मेट्रो सेवा पुन्हा सुरू (Mumbai Metro service) करण्याचा निर्णय राज्य सरकार (Maharashtra Government)ने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील मेट्रो सेवा १९ ऑक्टोबर (Mumbai Metro to resume service form 19 October) पासून टप्प्याटप्याने सुरू करण्यात येणार आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवत राज्य सरकारने आता मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच राज्यातील ग्रंथालये सुद्धा उद्यापासून (१५ ऑक्टोबर २०२०) सुरू करण्यात येणार आहेत.

१९ ऑक्टोबरपासून मुंबई मेट्रो सुरू

मुंबई मेट्रो सुरू करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर मुंबई मेट्रोकडून ट्वीट करुन सरकारचे आभार मानले आहेत. “मुंबई मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार. आम्ही यापूर्वीच सुरक्षा तपासणी आणि चाचणी घेण्यास सुरु केल्या आहेत. आता सोमवार, १९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८.३० मिनिटांपासून प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू करण्यास तयार आहोत.” 

शाळा-महाविद्यालये तुर्तास बंदच 

राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याच्या संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये ही पुढील सूचना येईपर्यंत बंदच राहणार आहेत. यापर्वी ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा-महाविद्यालयांबाबत चर्चा झाली असता सरकारने १५ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा असा निर्णय झाला होता. म्हणजेच राज्यातील शाळा, महाविद्यालये ही दिवाळीपूर्वी सुरू होणार नाहीत.

सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी 

मुंबई मेट्रो सुरू करण्यासोबतच राज्य सरकारने दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ करुन दिली आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार व दुकानांना दोन तास जास्त सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर १५ऑक्टोबरपासून बाजारपेठ व दुकाने अतिरिक्त दोन तास म्हणजे सकाळी ९ वाजेपासून रात्री ९ पर्यंत सुरू राहू शकतील.

कंटेन्मेंट झोनच्या बाहेर​ स्थानिक आठवडी बाजारांनाही परवानगी

कंटेन्मेंट झोनच्या बाहेर जनावरांच्या बाजारासहित स्थानिक आठवडी बाजारांनाही परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शहरी / ग्रामीण स्थानिक प्रशासनाची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील.

१५ ऑक्टोबरपासून ग्रंथालये सुरू

राज्यातील सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करून १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ संबंधी दिलेली मार्गदर्शक तत्वे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. यासंदर्भात नगरविकास विभागामार्फतची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील.

कौटुंबिक कार्यक्रमात पाहुण्यांची संख्या 

विवाह व इतर कौटुंबिक कार्यक्रमात पाहुण्यांची संख्या ५० पेक्षा जास्त ठेवता येणार नाही. तर अंतिम संस्कारांसाठी ही संख्या पूर्वी जारी केल्याप्रमाणे २० असेल. त्याचप्रमाणे उद्यान, पार्क आणि सार्वजनिक ठिकाणे पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. १५ ऑक्टोबरपासून कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेले बिजनेस-टू-बिजनेस (B2B) प्रदर्शनासाठीही परवानगी देण्यात आलेली आहे. उद्योग विभागाची मार्गदर्शक तत्त्वे यासाठी लागू असतील.

शिक्षक वर्गाला ५० टक्क्यांपर्यंत उपस्थितीची परवानगी

ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य असेल आणि प्रोत्साहन दिले जाईल. कंटेन्मेंट झोन बाहेरील ऑनलाइन टिचिंग किंवा टेली-कौन्सिलिंग व तत्सम कामासाठी ५० टक्‍क्‍यांपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेमध्ये उपस्थितीची परवानगी असेल. सुरक्षित आरोग्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागामार्फतची मार्गदर्शक तत्त्वे यासाठी लागू असतील.

‘या’ विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत काम करण्यासाठी परवानगी 

१५ ऑक्टोबरपासून उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये पीएचडी आणि विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत काम करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. परंतु उच्च शिक्षण संस्थांमध्येही ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल. राज्याच्या विद्यापीठांबरोबरच खासगी विद्यापीठांसाठीही विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना पीएचडी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता प्रयोगशाळेत प्रयोग करण्याची मुभा राहील.

बातमीची भावकी

अनलॉक संदर्भात राज्य सरकारकडून नवं परिपत्रक

  1. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी 
  2. उद्यापासून राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी 
  3. शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी नाही
  4. शाळेतील शिक्षकवर्गाला ५० टक्के उपस्थितीची मुभा
  5. १९ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी 

देशात यापूर्वीच मेट्रो सेवा सुरू

केंद्र सरकारने अनलॉक ४ अंतर्गत सात सप्टेंबरपासून मेट्रो सेवा श्रेणीबद्ध पद्धतीने सुरू करण्यास परवागनी दिली होती. तसेच या संदर्भात मेट्रोतर्फे एक एसओपी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र सरकारने मेट्रो सेवा सुरू कऱण्यास नकार दिला होता. पण आता सरकारने मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/maharashtra-unlock-government-allows-mumbai-metro-resume-service-form-19-october-in-phase-manner-and-libraries-to-reopen/317202