मुंबई बातम्या

सावधान ! विनामास्क आढळल्यास मुंबई महापालिका पोलिसांच्या मदतीनं कारवाई करणार – TV9 Marathi

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी वावरताना ‘मास्क’चा वापर करणे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मुंबई पोलीस दल, वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. (BMC and Mumbai Police jointly will take action against people for not using Mask)

इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांची एक विशेष बैठक व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मुंबई महापालिकेच्‍या सर्व २४ विभागांच्‍या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्‍ये ‘विना मास्क’ वावरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई आता अधिक कठोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी प्रभाग स्तरीय नियोजन करण्याचे व त्यासाठी संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे सहकार्य घेण्याच्या सूचना  करण्यात आल्या आहेत.

विनामास्क फिरणारांवर पोलिसांच्या मदतीनं कारवाई

‘विना मास्क’ विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलीस दल व वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करण्यात येणार. यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या स्तरावर ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, प्रभात फेरीला (मॉर्निंग वॉक) जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वैद्यकीय चाचण्‍या व्‍यापकतेने करण्‍याचे निर्देश

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचण्‍यांची संख्‍या वाढविण्‍याची गरज लक्षात घेऊन सर्व विभागस्‍तरीय सहायक आयुक्‍तांनी आपापल्‍या विभागातील दैनंदिन चाचण्‍यांची संख्‍या नियोजनपूर्वक वाढवावी असे आदेश देण्यात आले आहेत.

‘आरटीपीसीआर चाचणी’ व ‘रॅपिड अँटिजेन चाचणी’या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांची संख्या नियोजनपूर्वक वाढवण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात दोन्ही प्रकारच्या चाचण्या मिळून दररोज १४ ते १५ हजार चाचण्या केल्या जात असून ही संख्या २० हजारापर्यंत वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, महापालिकेचे सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, महापालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता, सार्वजनिक आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्या विविध खात्यांचे अति वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त शहाजी उमप उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 35 लाखांची दंडवसुली

मास्क न वापरल्यास दुप्पट दंड, मुंबई मनपा आणखी आक्रमक

(BMC and Mumbai Police jointly will take action against people for not using Mask)

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/bmc-and-mumbai-police-jointly-will-take-action-against-people-for-not-using-mask-285604.html