मुंबई बातम्या

मिठाईवरही एक्सपायरी डेट बंधनकारकच , मुंबई हायकोर्टने याचिका फेटाळली – Sakal

मुंबई, ता. 13 : दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईवर एक्सपायरी डेट लिहिणे आता बंधनकारक झाले आहे. (FSSI) एफएसएसएआयचा हा निर्णय ग्राहक हिताचा आहे असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय आज कायम ठेवला आणि निर्णयाला विरोध करणारी मिठाई विक्री संघटनेची जनहित याचिका दंडासह फेटाळली.

भारतीय अन्न सुरक्षा आणि  प्रमाणित प्राधिकरण ( एफएसएसएआय ) विभागाने खुल्या मिठाईच्या विक्रीवर एक्सपायरी डेट लिहिणे सक्तीचे केले आहे. याबाबत निर्णय ऑक्टोबरपासून लागूही झाला आहे. मात्र या निर्णयाला शहरातील मिठाईवाले व्यापारी संघटनेच्या वतीने याचिकेद्वारे आव्हान दिले होते.

महत्त्वाची बातमी : “राज्यपाल पदावर बसलेल्या व्यतीच्या वागण्यावर खेद वाटतो”; शरद पवारांचं थेट मोदींना पत्र

आज मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. अशाप्रकारची याचिका अकारण दाखल केली आहे. हा निर्णय सर्व ग्राहकांच्या हिताचाच आहे. जनहितासाठी असलेल्या या निर्णयाविरोधात केलेला याचिकादारांचा दावा फोल आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. याचिकाकर्त्यांना न्यायालयाने एक लाख रुपयांचा दंडही सुनावला असून कोविड केअर सहाय्यता निधीमध्ये दंडाची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

मिठाई खराब झाल्याच्या आणि नासलेल्या मिठाईमुळे त्रास झाल्याच्या अनेक तक्रारी राज्य सरकार आणि महापालिकेकडे आल्या होत्या. त्यामुळे सतर्कता म्हणून मिठाई कधीपर्यंत योग्य आहे याची माहिती तारखेसह (बेस्ट बिफोर) द्यावी अशी नोटीस जारी करण्यात आली होती.

मात्र त्याचे पालन न केल्यामुळे शासकीय आदेश प्नशसनाने जारी केला. हा निर्णय मनमानी करणारा आणि आमच्या अधिकारांवर आक्रमण करणारा आहे, असा दावा याचिकादारांनी केला होता.

( संपादन – सुमित बागुल ) 

writing best before date for sweets is mandatory bombay HC dismissed petition with fine

Source: https://www.esakal.com/mumbai/writing-best-date-sweets-mandatory-bombay-hc-dismissed-petition-fine-358604