मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांची बदनामी भाजपकडून; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट आरोप – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी/म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या आयटी सेलनेच फेक अकाऊंट काढून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी केली आहे, असा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केला. पोलिसांचा सायबर सेल या प्रकारणी तपास करत असून गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, सोशल मीडियावर मुंबई पोलिसांना बदनाम करण्याची मोहीम सुरू असल्याचे उघडकीस आले असून हे एक षडयंत्र असल्याचा आरोपही मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले असतानाच हजारो बनावट फेसबुक, ट्विटर अकाऊंट्सचा वापर करून मुंबई पोलिस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना ट्रोल केले जात आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात जसजशी तथ्ये समोर येत आहेत तसतशी वेगवेगळ्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर टीका केली जात आहे. याच माध्यमांपैकी सोशल मीडिया प्रमुख माध्यम आहे. यातील विशेष करून फेसबुक आणि ट्विटरवरून टीकेची झोड उडवली जात आहे. यातून पोलिसांची बदनामी होण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याने मुंबई पोलिसांनी ट्रोल करणाऱ्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली. प्राथमिक तपासादरम्यान ट्रोल करणारे हजारो प्रोफाइल बनावट असून केवळ टीका करण्यासाठी हे बनविण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशी बोगस अकाऊंट्स तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी, ‘आम्हाला बदनाम करण्याचा हा डाव आहे’, असा आरोप केला आहे. ‘एम्सच्या डॉक्टरांच्या अहवालावरून आम्ही केलेला तपास योग्य असल्याचे स्पष्ट होते. तपास अधिकाऱ्याने केलेल्या तपासाचा अहवाल सर्व अधिकाऱ्यांबरोबरच सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. सर्वसामान्य व्यक्तींनी कुणीच हा अहवाल पाहिला नव्हता. असे असताना केवळ आमची बदनामी करण्यासाठी याबाबत काहीही मते मांडून आमची बदनामी करण्यात आली’, असे सिंह यांनी सांगितले.

आयुक्तांच्या ट्विटर अकाऊंटचाही गैरवापर

मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचे स्क्रीनशॉट काढून त्याचा गैरवापर केल्याचाही प्रकार समोर आला आहे. या दोन्ही प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-defames-mumbai-police-says-state-home-minister-anil-deshmukh/articleshow/78518673.cms