मुंबई बातम्या

मुंबई जिल्हा बँकेची चौकशी – Loksatta

संजय बापट

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँके स गेल्या आर्थिक वर्षांत झालेला ४७.९९ कोटींचा तोटा तसेच भांडवल पर्याप्ततेत झालेली घट आणि मनमानीप्रमाणे झालेल्या कर्जवाटपाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून बँके च्या कारभाराची  चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची  तपासणी समिती धाडली आहे. बँके ने मात्र ही नियमित तपासणी असल्याचा दावा करीत कोणतीही अनियमितता नसल्याचा दावा केला आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती भाजपच्या ताब्यात असून विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बँके चे अध्यक्ष आहेत.या बँके त संचालक मंडळ मनमानीपणे कारभार करीत असल्याच्या तक्रारी सरकार दरबारी पोहोचल्यानंतर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी या बँके च्या कारभाराची झाडाझडती घेण्यासाठी एक समिती स्थापन केली असून त्यांना एक महिन्यात तपासणी अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

बँकेने गेल्या दोन वर्षांत स्वयंपुनर्विकास योजनेंतर्गत मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी कर्ज मंजूर केले आहे. मात्र कोणत्याही बँकेस अशाप्रकारे गृहनिर्माण प्रकल्पांच्या स्वयंपुनर्विकासासाठी कर्जे देता येत नसल्याचे रिझर्व बँकेने स्पष्ट केल्यानंतर आता या प्रकरणाचीही तपासणी करण्याचा निर्णय सहकार आयुक्तालयाने घेतला आहे. त्यानुसार विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे, सहनिबंधक राजेश जाधवर आणि जिल्हा उपनिबंधक जे.डी. पाटील यांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीला बँके च्या कारभाराची तपासणी करून एक महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

आकसातून निर्णय-दरेकर

याबाबत बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता, बँकेच्या कारभारात कोणतीही अनियमितता नसून सरकारने राजकीय आकसातून ही समिती तपासणीसाठी पाठविल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारच्या हमीनेच बँकेने काही साखर कारखान्यांना कर्जे दिली होती. मात्र ती थकल्याने २५० कोटींच्या थकहमी वसुलीसाठी बँकेने न्यायालयात दावा दाखल के ला आहे. ज्या कारखान्यांनी कर्ज थकविली आहेत, त्यांनाच सरकारने पुन्हा हमी दिली आहे. त्याबाबत बँकेने सरकारकडे विचारणा करीत थहकमीचे पैसे मागितल्याने सरकारने ही समिती पाठविली असून बँकेचा कारभार व्यवस्थित असल्याने समितीला काही मिळणार नाही असा दावाही त्यांनी केला.

* बँकेस गेल्या आर्थिक वर्षांत म्हणजेच मार्च अखेर ४७.९९ कोटींचा तोटा झाला आहे. तसेच ३१मार्च अखेर बँके च्या भागभांडवल पर्याप्ततेमध्ये घट होऊन ती ७.११ टक्यांपर्यंत खाली आली आहे.

*  बँकेने साखर कारखाने,अन्य कंपन्या, व्यक्तींना दिलेली कर्जे आदींची तापसणी करण्यात येणार आहे.

* बँकेतर्फे गेल्या पाच वर्षांत संगणकीय प्रणाली अद्यावत करण्यासाठी, बँकेच्या मुख्यालय आणि शाखांच्या  नुतनीकरणावर करण्यात आलेल्या वारेमाप खर्चाचीही तपासणी केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on October 1, 2020 12:19 am

Web Title: mumbai district bank inquiry abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-district-bank-inquiry-abn-97-2289797/