मुंबई बातम्या

Shivsena Criticism Opposition on Mumbai Waterlogging | Mumbai Rain | मुंबई का तुंबली? शिवसेना म्हणते…. – TV9 Marathi

मुंबई : “मुंबईतील पाणी तुंबले म्हणून बोंब मारणारे नागपूर, अहमदाबाद अशाच प्रकारे जलमय होते तेव्हा मात्र गप्प असतात,” अशी टीका शिवसेनेने विरोधकांवर केली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबल्याने पालिकेसह राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना शिवसेनेने चांगलेच फैलावर घेतलं आहे. (Shivsena Criticism Opposition on Mumbai Waterlogging)

“1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता. मुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणे आणि त्याच वेळी समुद्राला भरती असणे हा ‘योग’ नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल भाग जलमय होण्यात होत असतो. तरीही मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक आपले बोंबा मारणे सुरूच ठेवतात,” असा टोला शिवसेनेने विरोधकांना लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून मुंबई तुंबण्याची कारणं देतानाच विरोधकांवरही टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

हा तर सर्वच यंत्रणाचा अपमान

“प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पावसाने मुंबईचे काही भाग जलमय होतात, त्याचा परिणाम जनजीवनावर, वाहतुकीवर होतो. पुन्हा मुंबईची भौगोलिक आणि इतर स्थिती याचाही भाग आहेच. अशाही परिस्थितीत महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात. अशा वेळी त्यांच्याविरुद्ध एकतर्फी बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमानच आहे,” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

शिवसेनेचे टीकास्त्र

  • हवामान खात्याने मान्सूनच्या परतीचा ‘मुहूर्त’ काही दिवसांपूर्वी सांगितला आहे. तरी सध्या सुरू असलेले पावसाचे धुमशान पाहता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकणसह खान्देश, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आदी भागांत आणखी काही दिवस त्याचा मुक्काम राहील अशी चिन्हे आहेत. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जच आहेत, पण आपल्याकडे अनेकदा ‘मान्सूनची लहर; केला कहर’ अशीच स्थिती असते. हवामान खात्याने पावसाचा अॅलर्ट पुन्हा दिला आहे. तेव्हा प्रशासकीय यंत्रणांना हायअॅलर्ट राहावेच लागेल.
  • मुंबई आणि मुसळधार पर्जन्यवृष्टी हे काही नवीन समीकरण नाही. मंगळवारी तेच घडले. फक्त 24 तासांत तब्बल 286.4 मिमी पाऊस मुंबापुरीवर कोसळला. मागील अडीच दशकातील 24 तासांत कोसळलेला हा विक्रमी पाऊस होता. बुधवारीदेखील पावसाची बॅटिंग सुरूच होती. त्यामुळे अनलॉकमुळे जे काही जनजीवन मुंबईत सुरू झाले आहे ते ठप्प झाले. (Shivsena Criticism Opposition on Mumbai Waterlogging)

संबंधित बातम्या :  

Mumbai Rains | मुंबईत 48 तासात 240 मिमी पाऊस, हळूहळू मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर

Mumbai Rains | तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर, आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/politics/shivsena-criticism-opposition-on-mumbai-water-logging-due-to-yesterday-heavy-rainfall-272039.html