मुंबई बातम्या

‘गृहिणीचं कामही महत्त्वपूर्ण, कौतुक करायला हवं’, हायकोर्टाने दखल घेत दिली भरपाई – My Mahanagar

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भारतासारख्या देशात गृहिणी घर सांभाळण्यासाठी राबतात, मात्र त्यांच्या कामाची तेवढी किंमत घरातल्यांना नसते. साधं कौतुकही गृहिणींचे केले जात नाही. याबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचे वक्तव्य करत एक मोठा निर्णय दिला आहे. एका रस्ते अपघातात घरातील गृहिणी गमावलेल्या कुटुंबाला हायकोर्टाने न्याय मिळवून दिला असून पीडित कुटुंबाला ८.२२ लाखाची नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. तसेच गृहिणी ही कमावती व्यक्ति नसल्याचा दावा करणाऱ्या प्रतिवादीला फटकारत गृहिणीचे काम हे पैशात मोजता येणार नसल्याचेही कोर्टाने सुनावले.

नागरपूर खंडपीठातील न्यायधीश अनिल किलोर यांनी सांगितले की, “गृहिणी ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. ती कुटुंबाला एकत्र घट्ट बांधून ठेवते. नवऱ्याला योग्य साथ देण्यासोबतच ती मुलांना मार्गदर्शन देत असते, घरातील थोरामोठ्यांची काळजी घेत असते. एकूणच कुटुंब पद्धतीत गृहिणीचे महत्त्व हे फार मोठे आहे. गृहिणी ही दिवसातले २४ तास राबत असते. वर्षातून एकही दिवस सुट्टी घेत नाही. मात्र तिचे हे योगदान कुणीही लक्षात घेत नाही. तिच्या कामाला आर्थिक उत्पन्न नसते म्हणून त्याला महत्त्व द्यायचे नाही, हे चुकीचे आहे.”

प्रकरण काय आहे?

मार्च २००५ साली अमरावती येथे एक अपघात झाला होता. या अपघातात रामभाऊ गवई यांच्या पत्नी बेबीबाई गवई यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी रामभाऊ गवई आणि त्यांच्या दोन मुलांनी अचलपूर न्यायाधिकरणात दावा ठोकला होता. मात्र न्यायाधिकरणाने ३ फेब्रुवारी २००७ रोजी गवई कुटुंबाचा नुकसान भरपाईचा दावा फेटाळून लावला. बेबीबाई या गृहिणी असून त्या कोणतेही आर्थिक कमाई करत नसल्यामुळे कुटुंबाचा नुकसान भरपाई मागण्याचा दावा फेटाळण्यात आला.

हायकोर्टाने न्यायाधिकरणाचा आदेश उलटवून लावला

न्यायाधिकरणाने दावा फेटाळून लावल्यानंतर गवई कुटुंबियांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी सुरु असताना न्यायाधीश अनिल किलोर यांनी २००१ च्या सुप्रीम कोर्टातील एका निकालाचा उल्लेख केला. यानुसार गृहिणी, आई यांच्या मृत्यूनंतर पती आणि मुलांच्या व्यक्तिगत देखरेखीचे नुकसान होते. त्यामुळे ते नुकसान भरपाईसाठी पात्र असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निकालाचा आधार घेत हायकोर्टाने देखील गवई कुटुंबियांना भरपाई मिळाली पाहीजे असे सांगितले.

महिना ३ हजार प्रमाणे मोजले उत्पन्न

नुकसान भरपाईचा निकाल देत असताना हायकोर्टाने बेबीताई यांना गृहिणी या नात्याने महिना ३ हजार पगार निश्चित केला तर एक कामगार या नात्याने त्यात आणखी ३ हजारांची भर टाकली. याप्रमाणे रामभाऊ गवई आणि त्यांच्या दोन मुलांना ८.२२ लाखांची भरपाई देण्यात यावी, असे आदेश दिले.

ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड कराSource: http://www.mymahanagar.com/maharashtra/housewifes-role-most-challenging-least-appreciated-bombay-high-court/218965/