मुंबई बातम्या

मुंबई एनसीबीचं कार्यालय असलेल्या एक्सचेंज इमारतीत आग – Maharashtra Times

मुंबईः फोर्ट परिसरातील एक्सचेंज इमारतीत भीषण आग लागली असून याच इमारतीत एनसीबीचे कार्यालय आहे. एनसीबीची अधिकारी इमारतीमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या व अॅम्ब्युलन्स दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अद्याप आगीच कारण अस्पष्ट आहे. तसंच, कोणतीही जिवीतहानी नाही.

मुंबईतील फोर्ट परिसरात ही इमारत असून याच इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)चं कार्यालय आहे. इमारतीत मुंबई एसआयटीचे अधिकारीही असल्याचं बोललं जात आहे. एनसीबीच्या कार्यालयात सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्स प्रकरणाची चौकशी सुरू आहे. इथंच रियाला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं तसंच, रियाला अटक केल्यानंतर एनसीबी कार्यालयात एक रात्र कोठडीत ठेवण्यात आलं होतं.

वाचाः मराठा समाज आक्रमक; सांगलीत नेत्यांच्या घरापुढे करणार ‘असं’ आंदोलन

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थांची चौकशी करणाऱ्या एनसीबीनं अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना समन्स बजावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिने एनसीबीच्या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यासह बॉलिवूडमधील आणखी काही कलाकारांची नावं उघड केली होती. त्यासंदर्भात एनसीबी अधिक तपास करत असून या काही दिवसांत एनसीबी या कलाकारांनी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलवणार असल्याचं बोललं जातं आहे.

वाचाः भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, आठ जणांचा मृत्यू

सारा आणि श्रद्धा दोघांनीही सुशांतसोबत सिनेमात काम केलं होतं. तर, सारा अली खान सुशांतबरोबर थायलंडच्या ट्रीपवर सुशांतसोबत गेली होती तर श्रद्धा कपूर दोनदा सुशांतच्या फार्महाऊसवर गेली असल्याचं समोर आलं आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/fire-breaks-out-in-exchange-building-housing-ncb-office/articleshow/78231691.cms