मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठ परीक्षा अर्ज भरण्यास २० सप्टेंबरपर्यंत मुदत – Maharashtra Times

मुंबई विद्यापीठाच्या आणि संलग्न महाविद्यालयांमधील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पदवी परीक्षा किंवा पदवीपूर्व बॅकलॉग म्हणजेच केटी परीक्षेसाठी अर्ज केला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने आणखी एक संधी दिली आहे. १८ सप्टेंबरपासून असे विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयामार्फत ऑनलाइन शुल्क भरून ऑनलाइन परीक्षा अर्ज भरू शकतात.

परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबर २०२० पर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे केवळ तीन दिवस हे अर्ज भरण्यासाठी आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव अद्याप पदवी किंवा केटी परीक्षेचे अर्ज भरले नसतील, त्यांनी या तीन दिवसांच्या मुदतीत महाविद्यालयामार्फत ते भरावे असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही केले आहे.

दरम्यान, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याची लिंक आपोआप बंद होणार असल्यामुळे त्यानंतर अर्ज करता येणार नाही याची नोंद विद्यार्थी व महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापम मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.

महाविद्यालयांना विद्यापीठाने जारी केलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्र, स्वाक्षरी, नाव, माध्यम, परीक्षा केंद्र, विषय आदि माहिती बरोबर भरल्या आहेत, याची खात्री करूनच अर्ज इनवर्ड करावा. ही माहिती गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र यासाठी वापरण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज इनवर्ड झाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

पदवी परीक्षांसाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल : उदय सामंत

दरम्यान, अंतिम वर्ष परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांना ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबत विद्यापीठाला पत्र लिहून ही परवानगी दिली आहे. या पत्रानुसार आता राज्यातील विद्यापीठांना ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

परीक्षा १ ऑक्टोबर पासून

मुंबई विद्यापीठाच्या नियमित थिअरी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून MCQ पद्धतीने होणार आहेत. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील. प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबरपासून घेतल्या जाणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा कधी, कशा? सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-colleges-can-inward-final-year-and-kt-exam-forms-till-20th-september/articleshow/78181712.cms