मुंबई बातम्या

मोठी बातमी : “नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान, शिक्षण आणि आरोग्य विभागांमध्ये भ्रष्टाचार” – Sakal

नवी मुंबई : कोरोनाच्या काळातील टाळेबंदीचा फायदा घेऊन महापालिकेच्या उद्यान, शिक्षण आणि आरोग्य विभागांमध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गौप्यस्फोट बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. स्थानिक ठेकेदारांना डावलून एकाच कंत्राटदारामार्फत महापालिका सर्व प्रकारची कामे करून घेत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. या सर्व विभागातील कंत्राटदारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

मंदा म्हात्रे यांनी आज अभिजीत बांगर यांची भेट घेतली. या भेटीत म्हात्रे यांनी विविध विषयांवर बांगर यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबई क्षेत्रातील उद्यान विभागाची सर्व कामे मुंबईतील मे. एन.के.शाह इन्फ्राप्रोजेक्ट्स या एकाच ठेकेदाराला दिली असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार गेले 22 वर्षापासून उद्यानाचे संरक्षण व संवर्धनाचे काम कोणतीही दरवाढ न करता अविरत काम करीत आहेत. उद्यानातील कामे, माळी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच इतर गोष्टींचा भरणा करून 5 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना बिले अदा करण्यात आलेली नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

धक्कादायक खुलासा ! रिया आणि सुशांतने बनवला होता एक खास WhatsApp ग्रुप, चर्चा व्हायची ड्रग्सची

महापालिकेच्या कारभारामुळे स्थानिक कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 2017 पासून जी.एस.टी. लागू झाल्यापासून स्थानिक ठेकेदार जी.एस.टी. स्वखर्चातून भरत असल्याचे म्हात्रे यांनी आवर्जून नमूद केले. उद्यानातील अगोदर करून घेतलेल्या कामांचे कार्यादेश व देयके देण्यात आलेली नाहीत. 1 मे 2020 ते 16 मे 2020 कालावधीतील संवर्धनाची कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी केलेली असताना देखील त्यांचे बिल नवीन ठेकेदारास अदा करण्यात आले आहे.

महापालिकेने मे.एन.के.शहा इन्फ्राप्रोजेक्ट्स यांना सदरचे काम हे वार्षिक 24 कोटी 80 लाख रुपयांना दिले आहे. मात्र स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार हे काम 11 कोटी 30 लाख रूपयांमध्ये करून देण्यास तयार असतानाही पालिका त्यांना काम का देत नाही असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला. नवी मुंबईतील झोन 1 व झोन 2 या दोन्ही झोन मधील सर्व कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना डावलून नवी मुंबई बाहेरील एकाच ठेकेदाराला कसे देण्यात आले? या मागे काही आर्थिक देवाण घेवाण आहे का? किंवा यामागे राजकीय दबाव आहे का? असे प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केले.

गुड न्यूज आली, आता वकिलांनाही मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवासास परवानगी

तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक विभागामधील शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कंत्राट, आरोग्य विभागातील यंत्रणेचे कंत्राट या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

( संपादन – सुमित बागुल ) 

mla of navi mumbai alleges corruption in the construction of parks education and health department 

Source: https://www.esakal.com/mumbai/mla-navi-mumbai-alleges-corruption-construction-parks-education-and-health-department-346560