मुंबई बातम्या

फार मोठी चूक करताय…, सुचक वक्तव्यासह कंगनानं मुंबई सोडली | Bollywood actress Kangana Ranaut leaves from her residence for Mumbai Airport read details – Zee २४ तास

मुंबई : मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री Kangana Ranaut  कंगना राणौत हिला अनेक स्तरांतून विरोधाचा सामाना करावा लागला. शिवसेनेकडूनही कंगनावर तिच्या या वक्तव्यासाठी सातत्यानं निशाणा साधण्यात आला. सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेल्या कंगनानं पुन्हा एकदा मुंबई सोडल्याचं म्हटलं जात आहे. 

सूत्रांच्या आणि एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सोमवारी सकाळच्या सुमारास कंगनाला तिच्या मुंबईतील घरातून विमानतळाच्या दिशेनं जाताना पाहायला मिळालं. कंगना नेमकी कुठं चालली आहे, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. किंबहुना बी टाऊनच्या या क्वीननंही यासंदर्भातील कोणतीही माहिती अथवा संकेत दिलेले नाहीत. पण, सूत्रांच्या माहितीनुसार ती मनालीच्या दिशेनं रवाना झाली आहे. 

गेल्या बऱ्याच काळापासून महाराष्ट्र शासनाची कंगनाविरोधी भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय मुंबई पालिका प्रशासनाकडून तिचं घर आणि कार्यालयावरही कारवाई करण्यात आली, परिणामी हा संघर्ष वादग्रस्त वळणावर आल्याचं पाहायला मिळालं. 

मुंबईतून जाण्याच्या मार्गावर असणाऱ्या कंगनानं यावेळी ट्विट करत पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. ‘ज्यावेळी रक्षकच भक्षक झाले आहेत… लोकशाहीचं वस्त्रहरण सुरु आहे… मला कमकुवत समजून तुम्ही फार मोठी चूक करत आहात’, असं ट्विट तिनं केलं. 

मुंबईतून काढता पाय घेताना आपण, जड अंत:करणानं शहर सोडत असल्याचं ती म्हणाली. मला ज्या प्रकारे घाबरवण्यात, धमकवण्यात आलं, माझ्यावर हल्ले झाले, शिवीगाळ करण्यात आली. राहतं घर, कार्यालय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत आपल्याभोवती शस्त्रास्त्र आणि सुरक्षा रक्षकांचा वेढा होता त्यामुळं POK बाबत आपण केलेलं वक्तव्य योग्य होतं असं ठाम मत तिनं मांडलं आहे. 

दरम्यान, कंगनाचं हे ट्विट पाहता आता त्यावर नेमकं कोण आणि काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असंही सांगण्यात येत आहे की, कंगनाचा हा मुंबई दौरा अवघ्या काही दिवसांचाच असल्यामुळं ती परतली असल्याचंही म्हटलं जात आहे. 

Source: https://zeenews.india.com/marathi/entertainment/bollywood-actress-kangana-ranaut-leaves-from-her-residence-for-mumbai-airport-read-details/534710