मुंबई बातम्या

परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सुविधा पुरवा – Loksatta

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : येत्या मंगळवारपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या परीक्षांसाठी दौंड येथील महाविद्यालयाला पर्याय म्हणून दुसऱ्या केंद्राची जागा पुरवण्याची व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थिनींच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. दौंड येथील या महाविद्यालयाच्या इमारतीत करोना केंद्र सुरू असून ते हलवता येणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने सांगितल्याने उच्च न्यायालयाने हे आदेश दिले.

दौंड मेडिकल फाऊंडेशनच्या शुश्रूषा इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग होमची इमारतीसह महाविद्यालयाचे संपूर्ण संकुल राज्य सरकारने २७ मार्च रोजी करोना काळजी केंद्रासाठी ताब्यात घेतले होते; परंतु महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीयच्या विविध शाखांच्या परीक्षा जाहीर केल्यानंतर संस्थेने महाविद्यालयाचा परिसर परीक्षांसाठी उपलब्ध करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्या वेळी पर्यायी जागा उपलब्ध झाल्यावर तसेच महाविद्यालयात ठेवण्यात आलेले करोना रुग्ण अन्यत्र हलवल्यानंतर महाविद्यालयाची इमारत परीक्षेसाठी उपलब्ध करण्याचे सांगण्यात आले; परंतु परीक्षा तोंडावर आल्या तरी सरकारने रुग्णांना अन्यत्र हलवलेले नाही आणि महाविद्यालयाची इमारतही ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे संस्थेने अ‍ॅड्. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही इमारत संस्थेला उपलब्ध करणे शक्य नसल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आल्यावर न्यायालयाने सरकारला या परीक्षेसाठी, परीक्षेला बसणाऱ्या ८० विद्यार्थिनींच्या राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या विद्यार्थिनींच्या प्रवासाची तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही न्यायालयाने सरकारने

उचलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने या परीक्षेसाठी दौंडमधील दोन शाळा उपलब्ध केल्या आहेत. तसेच मुलींच्या राहण्याची सोयही उपलब्ध केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on September 7, 2020 2:03 am

Web Title: provide facilities to students for exams bombay hc zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/provide-facilities-to-students-for-exams-bombay-hc-zws-70-2268632/