मुंबई बातम्या

मुंबई-मनमाड एक्स्प्रेस धावणार – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई-नाशिक मार्गावरील प्रवाशांना पुढील शनिवारपासून दिलासा मिळणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-मनमाड एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार असून, १२ सप्टेंबरपासून ही गाडी रोज धावणार आहे.

सध्या सुरू असलेल्या अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात मनुष्यबळाची मर्यादा वाढवून कार्यालये सुरू आहेत. देशभरात प्रवाशांची संख्या वाढल्याने अनेक राज्यांनी गाड्या वाढवण्याची विनंती रेल्वे मंडळाला केली होती. त्यानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने अतिरिक्त गाड्यांची घोषणा करण्यात आली. १२ सप्टेंबरपासून या गाड्या देशभरात सुरू होतील.

०२१०९ विशेष मुंबई-मनमाड एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून संध्याकाळी ६.१५ मिनिटांनी सुटणार असून, रात्री १०.५० वाजता मनमाडला पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास (०२११०) सकाळी ६.०२ वाजता सुरू होणार असून सकाळी १०.४५ वाजता ती मुंबईत दाखल होईल. दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव या स्थानकांवर ही गाडी थांबेल. १७ द्वितीय श्रेणी आसनातील डबे आणि तीन वातानुकूलित चेअर कार अशी गाडीची रचना असेल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या गाडीच्या आरक्षणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. करोना संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या अटी-शर्ती व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-manmad-express-will-be-run-from-12-september/articleshow/77952499.cms