मुंबई बातम्या

kangana ranaut: कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही; गृहमंत्र्यांचं मोठं विधान – Maharashtra Times

मुंबई: मुंबई आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कंगनाने मुंबई पोलिसांची बदनामी केलीय. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. कंगनामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत आहे. आमचे पोलीस अधिकारी तिच्या विधानाची पाहणी करतील आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतील, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका केल्यानंतर कंगनाने थेट मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. ‘संजय राऊत यांनी मला जाहीर धमकी दिली असून पुन्हा मुंबईत येऊ नकोस, असं धमकावलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आजादी ग्रॅफिटी आणि आता ही जाहीर धमकी, मला मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे, असा सवाल कंगनानं तिच्या ट्विटमध्ये केला होता. त्यावरून राजकीयच नव्हे तर बॉलिवूडमधूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

कंगना राणावतला धनंजय मुंडेंनी झापले; म्हणाले…

कंगनाच्या या ट्विटला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझं नाव घेऊन कुणाला पब्लिसिटी स्टंट करायचा असेल तर खुशाल करा. पण मुंबई तुम्हाला पोसते. सर्व काही देते. ज्या मुंबईने हुतात्मे दिले. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोलू शकत नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. मुंबईबाबत काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात. मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावलं उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत. त्या पक्षांना पाकव्याप्त काश्मीरने मदतान केलं आहे का? तुम्हाला पाकिस्तानी लोकांनी मतदान केलं आहे का? मुंबई पोलीस हे पाकिस्तानचे पोलीस आहेत का? ज्या मुंबई पोलिसांनी अतिरेकी हल्ले परतवून लावून मुंबईचं संरक्षण केलं ते लोक काहीही बरळणार आहेत का? असा सवाल करतानाच झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे. ड्रग्सच्या गुळण्या करून आणि नशेच्या अंमलात कुणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल आणि अशा व्यक्तिला कोणी पाठिंबा देत असेल तर देशाचं राष्ट्रीयत्व किती खालच्या पातळीवर गेलं हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.

आम्ही पोकळ धमक्या देत नाही, थेट कृती करतो; राऊतांचा कंगनाला इशारा

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/kangana-does-not-have-the-right-to-live-in-mumbai-says-anil-deshmukh/articleshow/77928445.cms