मुंबई बातम्या

मुंबई महानगरात १८,५०० घरांची लॉटरी लागणार? ओसी मिळालेल्या इमारतीतल्या गृह खरेदीला प्राधान्य – Lokmat

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात वापर परवाना (ओसी) मिळालेल्या इमारतींमध्ये आजच्या घडीला १८,५०० घरे (रेडी टू मूव्ह) ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. या घरांच्या खरेदीसाठी ग्राहकांना जीएसटी भरण्याची गरज नाही. त्यात आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्काच्या सवलतीनंतर या घरांच्या विक्रीचा मार्ग सर्वाधिक प्रशस्त होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घरांची एकूण किंमत सुमारे २३,५०० कोटी असून डिसेंबरपर्यंत त्यांची विक्री झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४७१ कोटी जमा होतील. गृह खरेदीदारांच्या तब्बल ७०६ कोटी रुपयांची त्यात बचत होणार असून सरकारच्या तिजोरीला तेवढी तूट सोसावी लागेल.

कोसळलेल्या घरांच्या खरेदी-विक्रीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वसुलीत ३१ डिसेंबरपर्यंत तीन टक्के तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंतच्या व्यवहारांवर दोन टक्के सवलत जाहीर केली आहे. मार्च अखेरपर्यंत महानगर क्षेत्रात आणखी ३२,८५० घरे असलेल्या इमारतींना वापर परवाना मिळण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्कातील सवलतीचा त्यांनाही फायदा होऊ शकेल, असा अंदाज आहे. गेल्या दोन दशकांतील सर्वात कमी व्याज दराने सध्या गृह कर्ज उपलब्ध आहे. ओसी मिळालेल्या इमारतींमधील घरांसाठी जीएसटी आकारला जात नाही. त्यात आता सरकारने मुद्रांक शुल्कातही सवलत दिली आहे. याशिवाय आर्थिक कोंडी झालेले विकासक घरांच्या किमतीही काही प्रमाणात कमी करण्यास तयार आहेत. त्यामुळे सध्या वास्तव्यासाठी तयार असलेल्या या घरांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती दिली जाईल, असे मत अ‍ॅनरॉक प्रॉपर्टीच्या रिसर्च टीमचे संचालक प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांच्या भवितव्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे त्या इमारतींमध्ये गृह खरेदी करणे अनेकांना सुरक्षित वाटत नाही. ही बाबही तयार घरांच्या पथ्यावर पडणारी असल्याचे सांगितले जाते. पुणे शहरात सध्या वापर परवाना असलेल्या इमारतींमधील १५ हजार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत, तर मार्च अखेरपर्यंत त्यात आणखी २२ हजार ९०० घरांची भर पडेल.

७० टक्के परवडणारी घरे
अ‍ॅनरॉक प्रॉपर्टी अहवालानुसार, पुण्यातील वास्तव्यासाठी तयार असलेल्या ३५,३०० घरांपेकी ४४ टक्के घरे ४० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची आहेत. मुंबई महानगरात ही घरे मुंबई आणि ठाणेपलीकडच्या शहरांत आहेत, तर ४० ते ८० लाख रुपये किमतीची २६ टक्के घरे उपलब्ध आहेत. ८० लाख ते दीड कोटी रुपये किमतीची १९ टक्के घरे असून उर्वरित ११ टक्के घरांची किंमत दीड कोटीपेक्षा जास्त आहे.

English summary :
Will there be a lottery for 18,500 houses in Mumbai? Preference for home purchase in OC acquired building

वाचकहो, ‘लोकमत’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will there be a lottery for 18,500 houses in Mumbai? Preference for home purchase in OC acquired building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/mumbai/will-there-be-lottery-18500-houses-mumbai-preference-home-purchase-oc-acquired-building-a301/