मुंबई बातम्या

मुंबईतील हरित कवच कमी झाल्याने पूर परिस्थिती; ‘स्प्रिंगर नेचर मुंबई’ चा अहवाल – Sakal

मुंबई : मुंबईतील हरित कवच दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनियोजीत विकास आणि हरित कवचाचे प्रमाण कमी होणे, यामुळेच सध्या मुंबईत अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. ‘स्प्रिंगर नेचर मुंबई’ ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली. 

वातावरण फाउंडेशनच्यावतीने ‘वेटलँड व्यवस्थापन आणि संवर्धनात कायद्याची भुमिका’ या विषयावर शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये या अहवालावर चर्चा करण्यात आली. पर्यावरणवादी, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील व शहरातील कायद्याचे विद्यार्थी एकत्र आले होते. पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद, वकील गायत्री सिंह, वकील इमान अली यांनी मुंबईतील सध्याच्या पाणथळ भागांचे व्यवस्थापन व संरक्षण आणि शाश्वत अशी धोरणे तयार करण्यासाठी कायद्यातील कोणत्या गोष्टींचा आधार घेता येईल याची चर्चा केली. 

मुंबईतील वेटलँड सह हरित पट्टा दिवसेंदिवस कमी होतोय. गेल्या तीन दशकांमध्ये मुंबई भोवतालच्या हरित कवचामध्ये 42.5 टक्क्यांची घट झाली आहे. 1988 मध्ये मुंबईच्या 63,035 हेक्टर या क्षेत्रफळामध्ये 29,260 हेक्टरचे हरित कवच होते. जे 2018 मध्ये 16,814 हेक्टर इतकेच राहिले आहे. 30 वर्षांमध्ये 12,446 हेक्टर परिसरातील हरित कवच नष्ट झाले आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा मोठा आहे.

मुंबईला निसर्गाने भरभरून दिल आहे. इथे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही जैवविविधता जपणे महत्वाचे आहे. त्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचे वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांनी  सांगितले. मुंबईतील जैवविविधता जपण्यासाठी अपार प्रयत्न करावे लागतील. यासाठी तरूण कायद्याच्या अभ्यासकांनी पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या देशात जी जैवविविधता बाकी आहे, त्याचे संरक्षण न्याय व्यवस्थाच करू शकते, असे स्टॅलिन दयानंद म्हणाले.

संपादन – सुस्मिता वडतिले 

Source: https://www.esakal.com/mumbai/lack-green-cover-mumbai-has-led-possibility-floods-339835