मुंबई बातम्या

मोहरमच्या मिरवणुकीला सशर्त परवानगी – Loksatta

उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : मुंबईत शिया पंथीयांतर्फे मोहरमनिमित्त काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीला करोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्त परवानगी दिली. भेंडी बाजार ते भायखळ्यादरम्यान ही मिरवणूक काढली जाणार आहे.

सरकारच्या अटींनुसार शिया पंथीयांनी ३० ऑगस्टला सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत एकाच मार्गावरून ही मिरवणूक काढावी. ती पायी नसावी. मिरवणुकीत केवळ पाच जण सहभागी होतील. मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १०० मीटर चालण्याची मुभा देण्यात आली आहे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पाच सदस्यांनी त्यांची नावे आणि पत्ते मुंबई पोलिसांकडे सादर करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर गर्दीला आळा घालण्यासाठी किंवा मिरवणुकीवर देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यकता वाटल्यास जमावबंदीचा आदेशही सरकार लागू करू शकते, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या परवानगीबाबत शिया पंथीयांचे म्हणणे ऐकण्याचे आणि आवश्यक तो निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्याचवेळी सरकारने जर गणपती विसर्जनासाठी परवानगी दिली असेल तर मोहरम मिरवणुकीसाठीही ती द्यावी लागेल. याचिकाकर्त्यांची मागणी अमान्य केली तर तो भेदभाव होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

याचिकाकर्त्यांना अटी मान्य

करोनाच्या पार्श्वभूमीवर भेंडी बाजार ते भायखळा येथील शिया पंथीयांच्या कब्रस्तानपर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने घातलेल्या अटी मान्य असल्याचे याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना मिरवणूक काढण्यासाठी सशर्त परवानगी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 29, 2020 12:48 am

Web Title: bombay hc allows muharram procession with conditions in mumbai zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bombay-hc-allows-muharram-procession-with-conditions-in-mumbai-zws-70-2261265/