मुंबई बातम्या

मुंबई उपनगरीय रेल्वेचं भाडं वाढण्याची शक्यता – मुंबई लाइव्ह

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएमएमटी स्थानक परिसरात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सेवा-सुविधांच्या वापरासाठी मुंबई उपनगरीय रेल्वेची (लोकल) भाडेवाढ करण्याचे संकेत भारतीय रेल्वे स्थानक पुनर्विकास महामंडळानं (आयआरएसडीसी) दिले आहेत.

जागतिक वारसा लाभलेल्या या स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय २००८ मध्ये घेण्यात आला. आता या प्रक्रियेला गती दिली जात असून, लवकरच सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्त्वावर पुनर्विकास प्रकल्प राबविला जाणार आहे. पुनर्विकासासाठी स्थानक आणि रेल्वे हद्दीतील जमीन खासगी विकासकाकडं ६० वर्षांसाठी भाडेकरारावर देण्यात येणार आहे.

पुनर्विकासानंतर स्थानकात निर्माण झालेल्या सुविधांसाठी प्रवाशांना सेवाशुल्क द्यावे लागेल आणि त्याचा समावेश उपनगरीय रेल्वे प्रवासी भाड्यातत केला जाणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचा खर्च १,६४२ कोटी रुपये आहे. सप्टेंबर महिन्यात निविदापूर्व प्रक्रियेला सुरुवात होत असून, ३ वर्षांत हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर सेवाशुल्क लागू केले जाणार असल्याची माहिती मिळते.

विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी व पर्यटकांकरिता गॅलरी, कॅफेटेरिया, वाहनतळ अशा अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या सुविधा निर्माण होताच विमान प्रवाशांच्या तिकिटात जसे सेवा शुल्क (युजर्स चार्जेस) समाविष्ट केले जाते, तसेच सेवाशुल्क लोकल तिकिटात समाविष्ट होणार आहे. या सुविधांच्या खर्चापोटी वसुल होणारे सेवाशुल्क खासगी विकासकाकडं जाणार आहे. स्थानकावरील रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल, प्रसाधनगृह व अन्य सुविधा या खासगी विकासकाच्या अखत्यारितच राहतील.


हेही वाचा –

भविष्यात रेल्वे प्रवाशांना पनवेल ते कर्जत प्रवास करणं शक्य होणार

दादर, माहीममधील टॉवरमधील रहिवाशांसाठी १९९९ रुपयांमध्ये चाचणी


Source: https://www.mumbailive.com/mr/transport/mumbai-local-trains-ticket-may-be-increased-in-future-due-to-station-redevelopment-54571